आदर्श शिक्षक श्री. संदीप परब यांना " इंडियन एज्युकेशनल एक्सेलेन्स " पुरस्काराने सन्मानित...
मुंबई दि.१२, घाटकोपरच्या पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागात सध्या कार्यरत असलेले सहा.शिक्षक श्री. संदीप परब यांना नुकताच नवी मुंबई येथील ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल राष्ट्रस्तरीय इंडियन एज्युकेशनल एक्सेलेन्स या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
रविवार, दि. १० मार्च रोजी कामोठे येथील आगरी समाज कार्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जगविख्यात जादूगार मा.श्री.सतिश देशमुख साहेब, अमरावती जिल्ह्याचे DSP मा.श्री. दत्ताराम राठोड साहेब, TV9 मराठी च्या वृत्तनिवेदिका श्रीम. निकिता पाटील मॅडम व संस्थेचे अध्यक्ष श्री. महाजन साहेब आदी मान्यवर या समारंभास उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते श्री. संदीप परब यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व आकर्षक मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी एकूण ४५० नामांकने या पुरस्कारासाठी आली होती. त्यापैकी फक्त ३० मान्यवरांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
श्री. संदीप परब यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याबद्दल सन २०२३ चा बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभाग पुरस्कृत "आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार" प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांना साप्ताहिक भगवे वादळ, मुंबई च्या वतीने "महात्मा जोतिबा फुले शिक्षकरत्न" पुरस्कारही प्राप्त झाला होता. माणुसकी फाऊंडेशन, बुलढाणा यांच्यावतीने "माणुसकी भूषण गौरव पुरस्कार" तसेच MAC च्या वतीने "कलारत्न" पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. त्यामुळेच विद्यार्थीप्रिय, शिक्षकप्रिय, पालकप्रिय व समाजप्रिय अशी त्यांची आज ओळख आहे. गेली २७ वर्षे ते खाजगी अनुदानित प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत सहभाग घेतला आहे. उत्तम फलकलेखन, निवेदक, तंत्रस्नेही शिक्षक, ऑनलाईन कार्य, व्हिडीओ निर्मिती, स्कॉलरशिप व प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शक, उत्तम शिक्षक संघटनात्मक कार्य, सेवांतर्गत प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक, क्रीडा व कला मार्गदर्शक त्याचप्रमाणे प्रामाणिक वर्तन, प्रेमळ स्वभाव व सहकार्याची भावना आदी गुण त्यांच्यामध्ये अवगत आहेत. मागील २७ वर्षात त्यांनी बॅ.नाथ पै विद्यालय, भांडुप, शिशुविकास प्राथमिक विद्यालय घाटकोपर, सरस्वती विद्यामंदिर, घाटकोपर तसेच तिरंदाज व्हिलेज लो.प्रा. मनपा शाळा, पवई या शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरत केलेले आहे. आज पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांनी ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, नवी मुंबई या संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत.

.jpeg)


0 टिप्पण्या