सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुसंस्कृतपणाचा खोटा बुरखा टराटरा फाडणारे वास्तववादी नाटक.
दोन अंकी नाटक - परीक्षण डॉ सतीश पवार.
निसर्गसुंदर कोकणचे स्वर्गभुमी म्हणून इथल्या आणि बाहेरील साहित्यिकांनी खूप कौतुक केलेले आहे, पण या भूमीत आजही वळवळणारा जातीयतेचा नरक दाखवायचे धाडस फारसे कोणी केले नाही. हा कलंक इथल्या कवींच्या, साहित्यिकांच्या, पत्रकारांच्या आणि विचारवंतांच्या माथ्यावर नेहमीच राहणार आहे.
मात्र हे हुबेहूब सादर केले आहे आपल्या दोन अंकी " अंधाराचे सोबती " या नाटकात मूळ मालवण आणि आता मुंबईत असणारे डॉ श्रीकांत धारपवार यांनी.
दोन अंकी असणाऱ्या या नाटकात पहिला अंक मालवणी मुलखातील लोकांवर असणारा अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचा पगडा दाखवते. तर दुसरा अंक मुख्यत्वे चर्मकार समाजाला भेडसावणारा मंदिर भेदभाव प्रश्न आणि त्यानिमित्ताने बुद्ध झालेला महार समाज आणि आजही अपमान होत असून हिंदुत्वात अडकलेला चर्मकार समाज यांच्यातील विचारमंथन आणि वैचारिक द्वंद दाखवते.
या नाटकात कुठेही लेखकाने लिखाण स्वातंत्र्य घेतले नसून पूर्णपणे वास्तववादी आणि खरेखुरे प्रसंग उभे केले आहेत.
पहिल्या अंकात कोकणातील गावात बुवाबाजीच्या आहारी गेलेला समाज मिश्किल आणि परखड टिपणी करून दाखवला आहे. यात अनेकदा सामाजिक प्रबोधनासोबत वैद्यकीय जागृतीचेही छोटे छोटे सल्ले नाटकात टाकले आहेत.
महाराज, राधा, रामा , मयेकरिण ही मालवणी मुलखातील अविभाज्य पात्रे इथे जीवंत दिसतात. उत्तरार्धात ' आम्ही हिंदू असूनही आम्हाला देवळात का प्रवेश नाही, आमची ओटी गार्हाणी अजूनही वेगळ्या ठिकाणी का केली जाते, आमच्या वस्तीत देवाचे निशाण का येत नाही' हा अनुसूचित जातीच्या लोकांचा , विशेष करून चर्मकार समाजाचा प्रश्न मांडला आहे.
यातील काही प्रसंग तर जसेच्या तसे जीवंत केले आहेत. नायक ज्यावेळी आम्हाला मंदिर प्रवेश द्या असे निवेदन देतो तेव्हा घाडीगावकर ते हातात न घेता , त्याला स्पर्श न करता लांबूनच त्यावर पाणी शिंपडून शुद्ध करतो आणि मगच ते निवेदन वाचतो, हा प्रसंग ऐतिहासिक नसून मालवणी मूलखाच्या गावागावात मंदिरात आजही घडणारा लज्जास्पद प्रसंग आहे.
त्याचप्रमाणे गावात सगळीकडे फिरणारे देवाचे निशाण आमच्या वस्तीत आणा कारण आम्हीसुद्धा हिंदू आहोत, हा प्रसंग सुद्धा अप्रतिम सादर झाला आहे.
या कथेतच आंतरजातीय प्रेमकहाणी गुंफली आहे.
अपमान होऊनही हिंदू धर्माचा फुकाचा अभिमान सांगणाऱ्या चर्मकार समाजाला यात खडे बोल सुनावले आहेत. तसेच सवर्ण समाज आणि आपसातील भेद आजही मिटवू न शकलेला नवबुद्ध समाज यांनाही.
एवढे सगळे होऊनही शेवटी अस्पृश्य लोकाना मंदिर खुले होते का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या नाटकाचा मालवणी मुलखात होणारा आगामी प्रयोग पाहावा लागेल.
नाटकाचा संदेश आहे की आपले देव देवळात नसून समाजासाठी झटणारे महामानव हेच आपले देव.
आजही एकविसाव्या शतकात अनुसूचित जातीच्या लोकाना सुसंस्कृत मानल्या गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिर प्रवेश , ओटी गार्हाणी असल्या हास्यास्पद गोष्टींसाठी लढावे लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुसंस्कृतपणाचा खोटा बुरखा फाडायचे अत्यंत महत्वाचे काम लेखकाने केले आहे.
लेखक डॉक्टर श्रीकांत धारपवार हे केईम या प्रख्यात इस्पितळात एमबीबीएस झाले. या इस्पितळाचा एक विद्रोही इतिहास आहे. जे जे हॉस्पिटल या ठिकाणी इंग्रज डॉक्टर भारतीय डॉक्टर लोकाना कमी मानत, अन्याय करत. . त्यावर बंड म्हणून केईम इस्पितळ आणि जी एस मेडिकल कॉलेजचा जन्म झाला . हीच विद्रोही परंपरा डॉक्टर धारपवार यांनी राखली आहे. अन्यथा या विषयाला हात घालायला कोण लेखक, कवि, नाटककार तयार होत नाही.
गेली दोन वर्षे शुभांगी पवार या मुद्द्यावर काम करत आहेत. हा मुद्दा कोणाला नको आहे आणि त्यामुळे या मुद्द्यावर काम करणारे लोकही . अशा परिस्थितीत शुभांगी पवार यांचाही या निमित्ताने मुंबईत सत्कार घडवून आणणे हेही मोठे धाडस आहे.
गेल्या अठरा फेब्रुवारी रोजी शिवाजी मंदिर, दादर, मुंबई इथे या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला . याला डॉ भालचंद्र मुणगेकर, ज वि पवार , उर्मिला पवार,' सोनबा'कार रमाकांत जाधव, प्रकाश सरवणकर, नितीन तागडी IAS,additional commissioner,Customs, नितीन साळुंखे, संजय कुमार G.M.R.B.I, डॉ मिलिंद शेजवळ, प्रा राजेंद्र मुंबरकर हे मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या