आरसीएफ मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहाने साजरे
प्रतिनिधी : (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
नवी मुंबई : आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरम मुंबई च्या विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेले यावर्षीचे, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठींचे १९ वे वार्षिक स्नेहसंमेलन आरसीएफ वसाहतीतील गंगाधर देशमुख सभागृहात रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय एस. सी. मुडगेरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाले. प्रसंगी डॉक्टर सौ. स्मिता मुडगेरीकर, वित्त संचालिका श्रीमती नजहत शेख, भूतपूर्व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उदय शंकर झा, डी. के. वर्मा, संचालक एच. एस. करंगळे, भूतपूर्व कार्यपालक संचालक रा. ह. पवार, एम. एम. पाटील, आर. के. जैन, शिरीष भोसले, महाव्यवस्थापक, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग उस्फूर्तपणे या सोहळ्यात सहभागी झाले होते. सुमारे चारशे आरसीएफ च्या सेवानिवृत्त प्रतिनिधींनी यात सहभाग नोंदवला. काही कर्मचाऱ्यांची सपत्नीक उपस्थिती या कार्यक्रमास वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सहाजिकच त्यामुळे सोहळा समारंभ अधिक देखणा ठरला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिवंगत कर्मचाऱ्यांना सामुहिकरित्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन, विठ्ठल देवतेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या करकमलाद्वारे झाल्यावर नृत्य निर्देशिका सौ. विनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी अश्विनी व कुमारी इया यांनी नृत्याच्या माध्यमातून श्री गणेश वंदना सादर केली. तर सौ. सुलभा बारकुंड यांनी भगवान श्रीरामाचा मंत्र गाऊन कार्यक्रम अधिक भावपूर्ण केला.
प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे नॅपकिन बुके (कलरफुल रुमालापासून बनवलेले गुच्छ) देऊन स्वागत झाल्यानंतर फोरमचे अध्यक्ष व्ही. डी. पाटील यांनी फोरमच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. निवृत्त झालेले आपले सर्व सहकारी बांधव वर्षातून एकदा या व्यासपीठावर एकत्र यावे त्यांच्या सुखदुःखाची देवाण-घेवाण व्हावी आणि परस्पर विश्वास अधिक दृढ व्हावा या प्रमुख उद्देशाने स्थापन झालेल्या या फोरमचा उद्देश विशद करतानाच विशेषतः रोटरी क्लब चेंबूर सोबत आदिवासी विकास प्रकल्पातील सहयोगाविषयी उपस्थितांना सविस्तर कल्पना दिली.
प्रमुख पाहुणे एस. सी. मुडगेरीकर व सौ. स्मिता मुडगेरीकर यांच्या हस्ते वयाची ९० वर्षे पूर्ण केलेले निवृत्त कर्मचारी आर. सुब्रमण्यन तसेच कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही विविध स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम करत असलेले सर्वश्री डॉक्टर एस. पी. मोहंती, दत्ताराम विष्णू आंब्रे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार एस. सी. मुडगेरीकर साहेब, श्रीमती नजहत शेख मॅडम यांचे शुभहस्ते पार पडला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कंपनीचे सीएमडी एस. सी. मुडगेरीकर यांनी फोरमच्या कार्याचे कौतुक करून आरसीएफ च्या उत्पादन क्षमतेच्या भरभराटीची सर्व स्तरावरील सर्वांगीण माहिती देऊन सांगितले की, आज कंपनीचा जो विविध स्तरावर विकास दिसतो आहे तो कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे फलित आहे. हाच वसा घेऊन आज सर्व विभागातील कंपनीचे कर्मचारी व व्यवस्थापन कर्तव्य निष्ठेने काम करत आहेत. म्हणूनच कंपनीला भारत सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट अशा नवरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतात विविध प्रांतात राहणाऱ्या निवृत्त आरसीएफ कर्मचाऱ्यांना एकमेकांना भेटून आपली सुखदुःखे आदान - प्रदान करण्यासाठी फोरमने हे एक व्यासपीठ निर्माण केले आहे. ही कौस्तुकास्पद तसेच समाधानाची बाब आहे. म्हणून या फोरमच्या उपक्रमास आरसीएफ कडून आवश्यक ते सहाय्य नक्कीच मिळत राहील असे त्यांनी प्रतिपादन केले. असे सांगून त्यांनी कंपनीच्या पुढील दहा वर्षांच्या विकासाची (व्हिजन) दिशा स्पष्ट केली.
आरसीएफच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुविधा बाबत सतत सतर्क राहून, सकारात्मक विचार करुन सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. याचे सखोल विश्लेषण करुन मेडिकल बिलाचा मिळणारा परतावा (मेडिकल रिम्भर्समेंट) बाबत दृश्यवाक्य पद्धतीने समजावून सांगून उपमहाव्यवस्थापक (वैद्यकीय सेवा प्रमुख) डॉ. सौ. रेखा देवाडिगा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचे समाधान केले.
सुभाष हांडे देशमुख व विलास मेहता यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टपणे केले. बाळासाहेब शिंत्रे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे यथोचित आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. प्रभाकरराव साळुंखे, डी. टी. बारकुंड, सुभाष हांडे देशमुख, सुबोध मोरजकर, विलास मेहता, श्री. चंद्रगिरी, दीपक सालवणकर, आर. एस. नाईक, सी. एल. शर्मा यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच आरसीएफ व्यवस्थापनाकडून सर्वोपतरी सहकार्य मिळाले.
स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
----------------------------------
सुभाष हांडे देशमुख
सचिव
आरसीएफ एक्स एम्प्लॉइज सोशल फोरम.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

0 टिप्पण्या