सानेगुरुजींचे सारे जीवन माणसाने करुणाशील आणि संवेदनशील व्हावे यासाठीच होते.
मंदिर समानता चळवळ अस्पृश्यांसाठी नसून उच्चवर्णीय मनाचा मागासलेपणा संपावा यासाठी आहे. - डॉ रुपेश पाटकर.
डॉ रुपेश पाटकर.
दगडात देव पाहता तसाच माणसात सुदधा पहा हीच सानेगुरुजी यांची शिकवण होती. माणसाचा अंतरात्मा जागा व्हावा आणि सगळ्यांना त्याने प्रेमाने जवळ घ्यावे . कायद्यापेक्षा हृद्यपरिवर्तन होऊन सामाजिक प्रश्न सुटावेत हीच गुरुजींची अपेक्षा होती. पावित्र्य ही मनाची स्थिती आहे. सर्व माणसे ही मूत्राच्या विष्ठेच्या पिशव्या आहेत त्यामुळे कोणी स्वतःला उगाच श्रेष्ठ समजत असेल तर ते चुकीचे आहे असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत डॉ रुपेश पाटकर यांनी सानेगुरुजी यांच्या जयंतीनिमित्त केले.
अनादि मी अनंत मी , सामाजिक मंच कणकवली यांनी या ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केले होते. या मंचाच्या अध्यक्षा शुभांगी पवार या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरात अनुसूचित जातीच्या लोकांवर मंदिर प्रवेश आणि इतर भेदभाव बंद व्हावा यासाठी काम करत आहेत.
माझे आजोबा पणजोबा स्वातंत्र्य चळवळीत तुरुंग भोगलेले स्वातंत्र्य सैनिक होते. माझ्या वडिलांनी मला लिहिता वाचता येण्यापूर्वी सानेगुरुजींची ओळख करून दिली होती. माझ्या घरात सामाजिक बदलाच्या चर्चा चालू असत त्यात सानेगुरुजींचा उल्लेख कानावर पडत असे. शाळेत कथामालेत गुरुजींची भेट झाली. माझ्या लहानपणीच जात ही अंधश्रद्धा आहे आणि अस्पृश्यता ही क्रूर अंधश्रद्धा आहे याची मला जाणीव झाली होती असे डॉ पाटकर म्हणाले.
सानेगुरुजींचे सारे जीवन माणसाने करुणाशील आणि संवेदनशील व्हावे यासाठीच होते. त्यांचा धर्म हा प्रेमाचा , करुणेचा धर्म होता, ईश्वर सगळ्यांच्या ठायी आहे ही जाणीव करून देणारा धर्म होता. असे ते पुढे म्हणाले.
सानेगुरुजी यांनी पंढरपूर मंदीर प्रवेश आंदोलन नोव्हेंबर 1946 मध्ये हाती घेतले. चौधरी नावाच्या एका अध्यात्मिक माणसाने पांडुरंग चरणी सर्वांना जाता यावे यासाठी गुरुजींच्या मदतीची विनंती केली. ही विनंती यशस्वी व्हावी यासाठी माझ्याकडे काय आहे? तर केवळ माझा देह. तो मी पणाला लावीन असे गुरुजींनी ठरवले.
त्यावेळी गुरुजी बोर्डीला होते. कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशी त्यांनी लगेच पत्रक काढून उपोषण सुरू केले. तेव्हा एस एम जोशी, सेनापती बापट, अच्युतराव पटवर्धन यांनी त्यांना आधी हा मुद्दा जनतेमध्ये न्या, कशासाठी उपोषण करता आहात ते लोकांना कळले पाहिजे. जनतेच्या अंतरात्म्याला हाक मारणारे मत तयार करा आणि नंतरच उपोषण हा मार्ग स्वीकारा असा त्यांनी गुरुजींना सल्ला दिला.
तो मान्य करून गुरुजींनी महाराष्ट्र राज्यात झंझावती दौरा जानेवारी ते एप्रिल 1947 असा चार महिने केला. दिवसाला चार चार सभा घेतल्या. यावेळी बरेवाईट अनुभव आले. महाराष्ट्र राज्यातून तब्बल सहा लाख लोकांनी मंदिर अस्पृश्याना खुले करावे यासाठी समर्थन देणाऱ्या सह्या केल्या. तरीही मंदिर दरवाजे अस्पृश्याना खुले झाले नाहीत.
शेवटी राज्यभर दौरा , भाषणे करून दमलेले गुरुजी शेवटचे पाऊल म्हणून उपोषणाला पंढरीत आले तेव्हा त्यांना उपोषणाला बसायला जागा मिळाली नाही अशी वाईट परिस्थिती आली. मग तनपुरे महाराज यांच्या मठात गुरुजींना जागा मिळाली. येथे त्यांनी एक मे ते दहा मे 1947 असा दहा दिवसांचा कडक उपवास केला.
महाराष्ट्र राज्यात प्रकाश पडायचा असेल तर प्रकाशाचे बटन पंढरपूर आहे, ही अध्यात्मिक राजधानी आहे, सगळ्या महाराष्ट्र राज्याचे दैवत पांडुरंग आहे . इथे प्रवेश मिळाला तर सगळ्या महाराष्ट्र राज्यात दलितांना मंदिर प्रवेश मिळेल, असे गुरुजींना वाटत होते.
यावेळी सानेगुरुजी हा स्टंट समाजवादी पक्षाला फायदा व्हावा म्हणून करत आहेत असासुद्धा आरोप झाला. लवकरच स्वातंत्र्य येऊ घातले आहे आणि अस्पृश्य निर्मूलन कायदा होऊ घातला आहे. त्यामुळे या उपोषणाचा काही उपयोग नाही अशी भूमिका काहींनी घेतली.
या उपोषणाबद्दल महात्मा गांधींचा गैरसमज करून देण्यात आला. उपोषण करू नका म्हणून त्यांची तार आली. स्वतः अस्पृश्यते विरुद्ध लढणारा , ज्याने उपोषण हे अस्त्र अनेकदा उपसले ती सर्वोच्च व्यक्ती गुरुजींवर दबाव टाकत होती म्हणजे किती दबाव होता हे लक्षात येईल.
तरीही त्यांचा विरोध झुगारून गुरुजींनी उपोषण करायचे ठरवले.
रुढीवादी, सनातनी यांचा तर विरोध होताच. त्यावेळी काही पुरोहितानी विठ्ठलाचे प्राणतत्व मडक्यात काढून घेतले आहे, आता या मडक्याची पूजा करूया अशी बतावणी केली. आजही अशा अनेक पावित्र्यतेच्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगून मंदिर समानता टाळली जाते.
दहा दिवसांच्या उपवासाने गुरुजी अशक्त झाले होते, त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
शेवटी लोकसभेचे अध्यक्ष दादासाहेब मावळनकर यांनी पंढरपूर इथे येऊन यशस्वी शिष्टाई केली आणि अस्पृश्याना मंदिरात बिनशर्त प्रवेश मिळाला. यावेळी खूप जल्लोष झाला.
देव, अध्यात्म ही गोष्ट मनाशी संबंधित आहे. तसे पाहिले तर आपण सर्व मूत्राच्या, विष्ठेच्या पिशव्या आहोत. त्यामुळे कोणी स्वतःला उच्च समजणे चुकीचेच आहे.
आज 77 वर्षानंतर मंदिर प्रवेश , जातीव्यवस्था या गोष्टी कालबाह्य परिकथेसारख्या व्हायला हव्या होत्या, त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत. आजही मागासवर्गीय लोकांना देवळात भेदभाव सहन करावा लागतो हे खेदजनक आहे.
माणूस हीच माझी जात. जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव आहे, त्यामुळे मागासवर्गीय माणसांत सुद्धा देव आहे हीच सानेगुरुजींची शिकवण आहे. ही आपण आचरणात आणूया.
आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरात आणि सवर्ण वस्तीतील विहिरींवर अनुसूचित जातीच्या लोकांवर भेदभाव होतो आहे, ही खरी गोष्ट आहे. यासाठी डॉ रुपेश पाटकर यांनी आपण केलेल्या समाज चाचपणीचे काही अनुभव सांगितले. हा भेदभाव बंद व्हावा यासाठी अनादि मी अनंत मी , सामाजिक मंच काम करत आहे. यात त्यांना यश मिळो अशा शुभेच्छा देऊन त्यांनी आपले ओघवते व्याख्यान संपवले.
प्रसिध्द लेखक, स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक सानेगुरुजींचा जन्म 24 डिसेंम्बर 1899 ला झाला. त्यांच्या जयंतीचे 125 वे वर्ष चालू होतं आहे.
डॉ रुपेश पाटकर हे सिंधुदुर्ग आणि गोवा इथे सेवा देणारे मानसोपचार तज्ज्ञ, व्याख्याते आणि विचारवंत आहेत. त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त पुस्तके लिहिली असून समाजातील तळागाळातील घटक ज्यांची स्वतःवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची क्षमता नाही, त्यांच्या अन्यायावर ते अनेकदा निर्भीड पणे आवाज उठवत असतात.
https://youtu.be/3HcCNxBm7eA?si=WKpb41pWKSz0w6AB

.jpeg)

0 टिप्पण्या