महिलांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर...

महिलांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर
प्रतिनिधी (नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख :

उत्कर्ष जेष्ठ महिला मंडळ नेरुळ यांच्या विद्यमाने नेरुळ येथील मदर तेरेसा गार्डन मधील विरंगुळा केंद्रात दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या चिकित्सा शिबिरात प्रामुख्याने थायरॉईड,  लिपीड प्रोफाइल,  शुगर टेस्ट  या प्राथमिक आरोग्य रक्तचाचण्या करण्यात आल्या.  सुमारे ५० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. 

उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती स्वाती फडके, सचिव श्रीमती स्मिता माढेकर आणि उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात रामकृष्ण नेत्रालय चे प्रतिनिधी रणजीत दीक्षित व त्यांचे सहकारी तसेच अजय माढेकर,  प्रभाकरराव गुमास्ते आणि सहकारी यांचाही चांगला सहयोग लाभला. 

डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना महिलांमधील होणाऱ्या विविध आजारावर सखोल मार्गदर्शन करुन महिलांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे अगदी समर्पक शब्दात समजावून दिली. कोणताही आजार वरील टेस्टद्वारे अगोदरच कळला तर त्याला रोखण्यात लवकरात लवकर उपाययोजना करणे अधिक सुलभ व शक्य होईल, म्हणून सर्वांनी या बेसिक चाचण्या काही महिन्यांच्या अंतराने करत राहणे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे असे त्यांनी सुचित केले. येणाऱ्या पुढील काळात देखील असे विविध प्रकारचे शारीरिक दृष्ट्या महत्त्वाची आरोग्य चिकित्सा शिबिरे सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील असे श्रीमती स्वाती फडके यांनी सांगितले. रामकृष्ण नेत्रालयाचे विपणन सल्लागार रणजीत दीक्षित यांनी नेत्रालयाबद्दलची चालू उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. 

या आरोग्य चिकित्सा शिबिरासाठी आलेल्या प्रतिनिधींनी चिकित्सा करण्यासाठी आलेल्या महिलांची अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तपासणी केली. उत्कर्ष महिला मंडळाच्या सर्व भगिनींच्या प्रयत्नाने हे शिबीर यशस्वी झाले.
--------------+--------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या