नेरुळ ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये डॉ. एस. पी. किंजवडेकर यांच्या तैल चित्राचे अनावरण
( वार्ताहर (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:)
ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था नेरुळ यांच्या विद्यमाने दिनांक १० जुलै २०२३ रोजी ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये कै. डॉक्टर एस. पी. किंजवडेकर यांच्या स्मृतिप्रत्यर्थ त्यांच्या पूर्णाकृतीतील तैल चित्राचे समारंभ पूर्वक डॉ. उपेंद्र किंजवडेकर व त्यांच्या परिवाराच्या हस्ते उत्साही वातावरणात अनावरण करण्यात आले. या भावनिक सोहळ्या प्रसंगी डॉ. शं .पा.किंजवडेकर यांच्या पत्नी श्रीमती सुनिता किंजवडेकर उपस्थित होत्या.
श्री. रंगास्वामी यांनी म्हटलेल्या मंत्र घोषाने मंगलमय झालेल्या वातावरणात, कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर सुचेता किंजवडेकर यांनी सुश्राव्य असे पसायदान गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . प्रभाकर गुमास्ते यांनी प्रास्ताविक केल्यानंतर सौ. रेखाताई वाळवेकर , सौ. स्वाती फडके, विकास साठे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून तेजस्विनी अधिकारी तसेच डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर उपस्थित होते.
आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमती तेजस्विनी अधिकारी म्हणाल्या की समाजामध्ये तुमची ओळख तुमच्या सामाजिक कार्यामुळेच होते , त्यामुळे प्रत्येकाने आपला खारीचा वाटा का होईना तो सामाजिक कार्यासाठी उचलला पाहिजे. डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर म्हणाले की वडिलांचे सर्व चांगले संस्कार आमच्यावर झाले आहेत त्यामुळे आम्ही सत्यासाठी परखडपणे बोलतो. किंजवडेकर कुटुंबीयांसाठी हा एक भावनिक व आनंद सोहळा होतो आहे. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) आणि ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सर्वश्री अरुण रोडे, अण्णासाहेब टेकाळे, पांडुरंग क्षेत्रमाडे , श्री औंढे, अरविंद वाळवेकर, विवेक देशपांडे, शरद डिचोलकर , श्रीमती रेखा वाळवेकर , श्रीमती स्वाती फडके, दीपक दिघे, विकास साठे, सुभाष हांडे देशमुख , शिवाजी शिंदे , रणजीत दीक्षित, डॉक्टर तानाजी डफळ, नंदलाल बॅनर्जी, सीमा आगवणे, दत्ताराम आंब्रे, विजय सावंत, दिलीप जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये कर्मयोगी डॉक्टर शंकर पांडुरंग किंजवडेकर यांच्या कार्याचे गुणगौरव केले व ते आमचे प्रेरणास्थान व तीच एक ऊर्जा आहे असे प्रामुख्याने नमूद केले. डॉक्टर किंंजवडेकर यांनी तन-मन धन अर्पून हे ज्येष्ठ नागरिक भवन उभे करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या कार्यक्रमाचे हे संस्मरणीय क्षण घनश्याम परकाळे यांनी आपल्या व्हिडिओग्राफीने जतन केले आहेत. या नेत्र दीपक सोहळ्याचे प्रभाकर गुमास्ते यांनी आपल्या दिलखुलास शैलीत , नीटनेटके सूत्रसंचालन केले.
अंकुश जांभळे यांनी औचित्यपूर्ण आभार प्रदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की हा माझा स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. अशा या आनंदमयी सोहळ्याचे राष्ट्रगीताने सांगता झाली.
----------------------------------
0 टिप्पण्या