कोल्हापूर : (सुभाष हांडे देशमुख ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन ही कामगारांचे सर्वार्थाने हित जोपासणारी संघटना असून तिचे कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांनी दिनांक ८ मे रोजी कोल्हापूर येथे राजश्री शाहू स्मारक भवन यामध्ये पार पडलेल्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या अधिवेशनात काढले. प्रसंगी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ मुंबईचे दिलीप दादा जगताप, सहाय्यक कल्याण आयुक्त पुणे चे समाधान भोसले, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने तसेच राज्याच्या सर्व जिल्ह्यातील असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, विभागीय सदस्य व गुणवंत कामगार उपस्थित होते.
समाजकार्याने प्रभावित झालेल्या महाराष्ट्रातील प्रमुख गुणवंत कामगारांनी एकत्र येऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेची शासन दरबारी नोंदणी करून स्थापना केली आहे. या असोसिएशनच्या विद्यमाने कोल्हापूर मधील शाहू स्मारक भवन येथे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले होते. मोठ्या उत्साही वातावरणात हे अधिवेशन पार पडले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रविराज इळवे पुढे म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, संघटना व आस्थापना तसेच समाजातील विविध घटकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. या गुणवंत कामगारांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
दिलीप दादा जगताप यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या समोरील सध्याच्या काळात असलेल्या विविध अडचणी, त्यांच्या व्यथा, केंद्र सरकारचे भांडवलशाही धोरण, बदलते कामगार कायदे, सेवानिवृत्तीनंतर मिळणारी तटपुंजी पेन्शन, आदीबाबत परखड मते व्यक्त केली.
निर्मिती विचार मंचचे अनिल म्हमाने यांनी संघटना बांधणी व तिचे महत्त्व विशद करून भविष्य काळामध्ये आपण जर संघटित राहिलो तरच कामगारांचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे असे स्पष्टमत व्यक्त करून विविध संघटना व विविध चळवळी यांच्यामध्ये सुरू असलेले राजकारण हेवेदावे यामुळेच कामगार वर्ग तसेच चांगल्या चळवळी अडचणी येत असल्याचे सूचित केले.
शेवटी नरेंद्र रहाटे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे यथोचित आभार मानले. सर्वश्री दिलीप घोलप, महादेव चक्के, देवराव कोंडेकर, मुकुंद केकाणे, दिलीप साटम, रत्नाकर शिंदे, केरबा डावरे, गजानन तिडके, शैलेंद्र इंगळे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अपूर्व मेहनत घेतली.
---------------------------------


.jpeg)

.jpeg)


.jpeg)
.jpeg)
0 टिप्पण्या