गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
आधीच आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतील वरिष्ठ आणि दिग्गज नेते मानले जातात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांची भेट घेतली होती. त्यामुळे कीर्तिकर शिंदे गटात जाणार अशा चर्चा तेव्हापासून रंगल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी गजानन कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे अनेकदा कीर्तिकरांनी शिंदेंचं तोंड भरून कौतुकही केलं होतं. त्यामुळे कीर्तिकर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणार का ? यावर तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
कोण आहेत गजानन कीर्तिकर
गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. १९९० ते २००९ या काळात चार वेळा आमदार राहिले आहेत. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचं शिंदे गटात जाण उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
0 टिप्पण्या