डोंबिवलीत २७२ किलो गांजासह दोन तस्करांना अटक



  ४७.७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली आणि आसपासच्या भागात वितरणासाठी आणलेला गांज्याचा मोठा साठा या पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून दोघा

तस्करांचा अटक केली. या बदमाश्यांकडून कारसह विक्रीसाठी आणलेला तब्बल 272 किलो ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. फैसल फारूख ठाकुर (21, रा.  माझगाव, मुंबई) आणि मोहम्मद आतीफ हाफीज उल्ला अन्सारी (32, वर्षे रा.  गैबीनगर, भिवडी) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. 

     डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागात अवैध गांजा (अंमली पदार्थाची) विक्री होत असल्याची माहिती मानपाडा पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल भिसे आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी उंबार्ली गावाच्या हद्दीत फिल्डींग लावली होती. गावाबाहेर असलेल्या मोकळ्या रानमाळावर गांजा विक्रीसाठी दोन तस्कर कारमधून येणार असल्याने या पथकाने त्यांना पकडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. इतक्यात एक इन्होव्हा कार संशयास्पदरित्या येऊन थांबताच पोलिसांनी या कारवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कार तेथून भरधाव वेगात दांबटली. मात्र पोलिसांनी थरारक पाठलाग करत या कारला मोठ्या धाडसाने थांबवले. कारमध्ये असलेल्या इसमांसह कारची तपासणी केली असता, त्यात 272 किलो वजनाचा गांजा वेगवेगळ्या प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये आढळून आला. हा गांजा येथूनच कल्याण-डोंबिवलीच्या विविध भागांत विक्रीसाठी वितरीत करण्यात येणार असल्याची कबुली दोन्ही तस्करांनी पोलिसांजवळ दिली.

     याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायदा 1985 चे कलम 8 (क) 20 (ब) आय (क), 29 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फैसल ठाकूर आणि मोहम्मद अन्सारी दोघा तस्करांकडून 272 किलो ग्रॅम वजनाच्या गांज्यासह इनोवा कार आणि 8 मोबाईल फोन असा 47 लाख 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या