दिवसाढवळ्या चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघे जेरबंद 71 तोळे सोने जप्त



मानपाडा पोलिसांची कारवाई


डोंबिवली  ( शंकर जाधव )


दिवसाढवळ्या घरफोडी करून 1 किलो वजनाचे सोने चोरी करणाऱ्या एकास मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 36 लाख रुपयाचे जवळपास 71 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. मूळचा पश्चिम बंगालचा असणारा आणि मुंबई येथे रहणारा अभिजित आलोक रॉय ( 36) या आरोपीला मानपाडा पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे अटक केली आहे.

     या आरोपीने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले 6 गुन्हे आणि टिळकनगर हद्दीत केलेला 1 गुन्हा उघडकीस आला असून 712 ग्रॅम सोने आणि 258 ग्रॅम चांदी असा एकूण 36 लाख रुपयांचा मुद्देमाल मानपाडा पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हा अभिजित दिवसा चोऱ्या करत असे. ज्या इमारतीला वॉचमन नाही अशा इमारती हेरून त्यानंतर तो चोरी करत. तो स्वतः सुरुवातीला सोने गाळण्याच्या व्यवसायामध्ये होता. मात्र या व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने दहा वर्षापासून सोने चोरीचा मार्ग स्वीकारला होता. तर एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधून टाळे फोडून भंगार चोरी करणाऱ्या इम्रान अबलेश खान (25, रा. मानगांव, डोंबिवली) आणि रियाज रमजान खान (36, रा. भिवंडी) या दोघांना देखील घरफोडीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन एक मोटार सायकल, दोन मोबाईल, कॉपर, पॉलीकॅब वायर, पितळी वॉल व गाडीचे सायलन्सर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींकडुन मानपाडा व टिळकनगर पोलीस ठाण्यामधील एकुण 10 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, यांच्यासह प्रशांत वानखेडे, राजेंद्र खिलारे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, तारांचद सोनवणे, विजय कोळी, प्रविण किनरे, दिपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, महेंद्र मंझा, शांताराम कसबे या पथकाने ही कामगिरी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या