* लाखो रुपयांचे मोबाईल,सीसीटीव्ही लंपास
मुंबई- चेंबूरमधील सतत वर्दळीचे ठिकाण असलेल्या सायन-ट्रॉम्बे महामार्गावरील चेंबूर नाका परिसरात ऋषी कम्युनिकेशन नावाच्या एका प्रसिद्ध मोबाईल विक्रीच्या दुकानात जबरी चोरी झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
अनोळखी चोरटय़ांनी या दुकानातील सुमारे ३० ते ३५ लाख रुपये किमतीचे सर्व मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली आहे.विशेष म्हणजे चोरटय़ांनी दुकानातील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर सुद्धा लांबविला आहे.
याबाबतची हकिकत अशी की, चेंबूर नाक्यावर अकबर अली समोरील अग्नीशमन दल केंद्राजवळ निशिकांत मिश्रा यांच्या मालकीचे ऋषी कम्युनिकेशन नावाचे नवीन मोबाईल विक्रीचे दुकान आहे.या दुकानात चार कामगार काम करतात. दोन दिवसांपूर्वी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मालक निशिकांत मिश्रा आणि सर्व कामगार दुकानाचे शटर बंद करून आपापल्या घरी निघून गेले. दुसर्या दिवशी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानमालक मिश्रा हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर थोडे खालून उघडे असल्याचे दिसून आले. तसेच कुलुपही तोडण्यात आले होते. त्यानंतर मिश्रा यांनी दुकानात प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. दुकानातील सर्व नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल मोकळे बॉक्स तिथेच टाकून लंपास करण्यात आले होते. तसेच काऊंटरच्या ड्रावरमधील रोख रक्कम १८ हजार रुपये आणि सीसीटीव्ही व डीव्हीआर चोरून नेण्यात आला होता. त्यानंतर निशिकांत मिश्रा यांनी तत्काळ चेंबूर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही जबरी चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पुढील तपास चेंबूर पोलीस करत आहेत.याच दिवशी याच पोलीस ठाणे हद्दीत आणखी एक चोरीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

.jpeg)

0 टिप्पण्या