२०२४ ला रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचा खासदार- अनिकेत पटवर्धन


खासदार विनायक राऊत यांना आव्हान


रत्नागिरी ( शंकर जाधव ) 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर वाट्टेल त्या भाषेत टिका करत आहेत. राऊतांचा तोल गेला आहे. त्यांनी असे बेछूट आरोप करणे बंद करावे. हिंमत असेल तर त्यांनी २०२४ ला या मतदारसंघातून निवडून दाखवावे, असे आव्हान भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिले आहे. तसेच या मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार खासदार म्हणून विजयी होईल, असा दावाही केला आहे.


खासदार राऊत हे भाजपा-शिवसेना युतीच्या कालावधीत दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाची रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताकद त्यांच्या पाठीशी होती. परंतु आता नाहीये. हिंमत असेल तर आता पुन्हा निवडून येऊन दाखवा, असे भाजपा कार्यकर्ते बोलू लागले आहेत, असा इशारा यावेळी पटवर्धन यांनी दिला.


महाराष्ट्रात सत्तांतर नाट्य घडल्यानंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार विनायक राऊत हे भाजपाच्या नेत्यांवर चुकीचे आरोप करत आहेत. ते वाईट भाषेत बोलत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपाचे तमाम कार्यकर्ते सज्ज आहेत. पण आम्ही त्यांच्यासारख्या वाईट भाषेत उत्तर देऊ शकत नाही, ती भाजपाची संस्कृती नाही. त्यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत जिंकून दाखवावे, असे आव्हान पटवर्धन यांनी दिले आहे.


एका राऊतांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच ४० आमदार बाहेर पडले आणि हिंदुत्वासाठी भाजपासोबत युती केली आहे. त्यामुळे आता दुसरे राऊत वाईट भाषेत बोलून राहिलेली इज्जत सुद्धा घालवत आहेत. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीका करून प्रसिद्धी मिळवत आहेत. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला, हे राजकारण योग्य नव्हे, असेही त्यांनी सांगितले.


भाजपा आणि शिवसेनेची युती ही माननीय शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत पंतप्रधान भाजपा नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी अशा नेत्यांनी अनेक वर्षे जपली. परंतु अन्य पक्षातून नव्याने शिवसेनेत आलेल्यांना याची नीट माहिती नाही. त्यामुळे भाजपाचा झेंडा अनेक दशके खांद्यावर घेतलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी निष्ठा शिकवू नये, असा इशाराही अनिकेत पटवर्धन यांनी नाव न घेता दिला.


२०१४ व २०१९ मध्ये आमदार उदय सामंत हे शिवसेनेतच होते आणि त्यावेळी ते राऊतांसाठी चांगले होते. श्री. राऊत त्यांचा डंका पिटत होते. पण आता श्री. सामंत हे शिंदे गटात गेल्यावर असे काय झाले? असा सवाल पटवर्धन यांनी उपस्थित केला. राऊतांच्या मताधिक्यात दीड लाख मते भाजपची होती, हे त्यांनी विसरू नये. रिफायनरीविरोधात मोर्चा निघाला, सुनावणी सुरू असताना राऊत हे सामंत व तत्कालीन उद्योगमंत्री देसाई यांचा उदोउदो करत होते. परंतु यांनीच रिफायनरीचे वाटोळे केले आहे. दोन वेळा खासदार झालेल्या राऊतांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी कोणत्या ठोस योजना, प्रकल्प आणलेत त्याची माहिती द्यावी. असे मेळावे होत असतात. मेळाव्यात राऊतांनी सामंतांवर टिका केली. सामंतांवर टीका करून राऊत मातोश्रीवर मोठेपणा मिळवत आहेत. पण सामंतांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले नाही. ते निवडणूक आली की त्याचे उत्तर देतील, असे दिसते. त्यामुळे राऊतांनी भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा सेनेत काय चालले आहे, हे पाहावे, असा टोला पटवर्धन यांनी हाणला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या