बदलापूर रोडला अपघातात खड्ड्यात आदळून बसच्या धडकेत तरुण ठार,



   केडीएमसी चालकावर गुन्हा दाखल  


 डोंबिवली ( शंकर जाधव )


काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात आदळून हा तरुण शेजारून जाणाऱ्या भरधाव वेगातील केडीएमसीच्या बसखाली आला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत पावलेल्या तरुणाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून  केडीएमसी  बसचालकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अंकित राजकुमार थैवा ( २६ ) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.अंबरनाथ येथील एमआयडीसी रोडला असलेल्या आनंदनगर मधील गुड मॉर्निंग सोसायटीतील अंकित हा हेल्थ केअर फार्मा कंपनी (घणसोली, नवी मुंबई ) येथे काम करत होता.नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास MH 05. ED-8225 क्रमांकाच्या स्कूटरवरून कामाला निघाला होता.अंकित हा बदलापुर रोडने काटई सर्कलकडे जाणाऱ्या रोडवर खोणी म्हाडा वसाहतीसमोर आला असता रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यात त्याची स्कूटर आदळली.बाजुने चाललेल्या केडीएमसीच्या MH 05R-1104 क्रमांकाच्या बसखाली येऊन गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात मृत तरुणाचे वडील रामकुमार थैवा थैवा थैवा ( ५४ ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून केडीएमसीच्या बस चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.   



  सध्या पावसाच्या तडाख्याने साऱ्याच रस्त्यांची वाताहत झाली आहे.यात बदलापूर पाईपलाईन रोडला देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यात खड्ड्यात आदळून छोट्या-मोठ्या वाहनचालकांचे अपघात होत आहेत.यासंदर्भात माहिती देताना डोंबिवली एमआयडीसीचे उपअभियंता विजय शेलार यांना विचारले असता ते म्हणाले, कल्याण-डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र रस्त्यात खड्डे पडले आहेत.गेल्या आठ-दहा दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून पावसामुळे खड्ड्यातील माती आणि खडी बाहेर पडते.बदलापूर पाईपलाईनच्या एका बाजूकडील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूकडील रस्ते  सिमेंट काँक्रीटचे काम लवकरात लवकर सुरु करू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या