धरणग्रस्तांच्या सहनशिलतेला अजून पुन्हा एकदा दिला छेद

 धरणग्रस्तांची तीव्र नाराजी : कोणत्याही मागण्या पूर्ण न करता पोलीस बंदोबस्तात नरडवे धरणाचे काम सुरू



कार्यकारी अभियंत्यांची प्रकल्पग्रस्तांसोबत ची चर्चा ठरली निष्फळ



कणकवली: नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र विरोधानंतर देखील आज शुक्रवारी दुपारनंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात नरडवे धरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र जोपर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम सुरू करू देणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेत काम सुरू करण्यास ठाम विरोध केला. त्यामुळे पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांनी प्रकल्पग्रस्तांशी दिवसभर चर्चा करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. अखेर सायंकाळी 6 वा.पासून पोलिस बंदोबस्तात धरणाचे काम सुरू करण्यात आले. कणकवलीचे डीवायएसपी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे हे वरिष्ठ पोलिस अधिकारीही यावेळी उपस्थित होते.


पंतप्रधान सिंचन विकास योजनेंतर्गत नरडवे धरण प्रकल्पाला निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी पाटबंधारे विभाग प्रयत्नशील आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करू देणार नाही, अशी भुमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी गेल्या महिन्यात धरणाचे काम बंद पाडले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्यांनी जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाची घळभरणी केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार शेतजमिनीला पर्याय म्हणून हेक्टरी 50 लाख देण्याबाबतचा निर्णयही शासनाने घेतला आहे. प्रकल्पाचा मातीबांध एकजीव करण्यासाठी महमदवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात येणार असला तरी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पाला सहकार्य करावे, अशी भुमिका घेत पाटबंधारे विभाग प्रकल्पग्रस्तांना राजी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी वेळोवेळी बैठकाही झाल्या आहेत. पालकमंत्र्यानीही प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करत प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली होती. जर प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर हा प्रकल्प पंतप्रधान सिंचन विकास योजनेतून बाहेर जावू शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी नरडवे धरणाचे काम सुरू करण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसआरपीसह मोठ्या प्रमाणावर पोलिस कुमक धरणस्थळी नेण्यात आली होती. मात्र प्रकल्पग्रस्तांनी काम सुरू करण्यास विरोध केला. जोपर्यंत आमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत महमदवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करू देणार नाही, अशी भुमिका घेत प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी ठाण मांडून होते. यावेळी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे प्रभाकर ढवळ, गणेश ढवळ, संतोष सावंत, नित्यानंद सावंत, जयराम ढवळ, लक्ष्मण ढवळ आदी प्रकल्पग्रस्तांशी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांनी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही असे सांगत काम सुरू करण्यासाठी त्यांना राजी करण्याचा प्रयत्न केला. दिवसभर चर्चांच्या फेर्‍या सुरू होत्या. तसेच प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यास निर्माण होणार्‍या अडचणींबाबतही प्रकल्पग्रस्तांना कल्पना दिली. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भुमिकेवर ठाम होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत धरणाचे काम सुरू झाले नव्हते. अखेर सायंकाळी 6वा.पासून पोलिस बंदोबस्तात धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या