महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनविण्यासाठी प्रयत्न सुरु




 

डोंबिवली ( शंकर जाधव ) महापालिकेच्या शाळातील विदयार्थ्यामधील टॅलेंट (गुणवत्ता) शोधून त्यांना राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे प्रोत्साहन देता येईल याबाबत सर्वतोपरी मार्गदर्शन करु असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काढले. महर्षी रघुनाथ कर्वे प्रा.वि. कडोमपा शाळा क्र.१२  येथे आयोजिलेल्या कल्याण (प.) परिसरातील उंबर्डे, सापाड, वाडेघर, कोळीवली, हि-याचापाडा, आधारवाडी येथील महापालिकेच्या शाळातील विदयार्थ्यांच्या क्रिडा नैपुण्य चाचणी शिबीराच्या आयोजनप्रसंगी बोलत होते.



    महापालिका शाळेतील सुमारे चौदाशे विदयार्थ्यांची बॅटरी टेस्ट होत आहे. यात निवड झालेल्या विदयार्थ्यांना महापालिकेच्या वतीने व्यवस्थित प्रशिक्षण दिले जाईल. कल्याण डोंबिवली नगरीमध्ये खेळाच्या वातावरणाची निर्मिती व्हावी आणि येथून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेत असे आमचे प्रयत्न राहतील असेही ते पुढे म्हणाले‍. केंद्र शासनाच्या `फ्रिडम टू वॉक` स्पर्धेत महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक पटकाविले आहे पहाटेच्या वेळेस वॉकची, सायकलिंगची संस्कृती आपल्याकडे रुजते आहे म्हणूनच पहाटे ५ ते ८ या वेळेत काही रस्ते फक्त वॉकसाठी, सायकलिंगसाठी ,रनिंगसाठी आणि लहान मुलांना स्केटिंग साठी उपलब्ध करुन देणार आहोत अशी माहिती पालिका आयुक्तांनी यावेळी दिली.


  `माय सिटी फिट सिटी` या आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार शालेय विदयार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या बौध्दीक आणि शारिरीक क्षमतेचा विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या महर्षी रघुनाथ कर्वे प्राथमिक विदयालय शाळा.क्र.१२  उबंर्डे कल्याण पश्चिम या शाळेत आज सकाळी विदयार्थ्यांच्या बॅटरी टेस्टचे आयोजन करण्यात आले होत. यामध्ये ३० मी. धावणे , लवचिकता चाचणी, ६x१० शटल रन,थ्रो बॉल , उभी लांब उडी या क्रिडा प्रकारांचा अंतर्भाव होता.यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपआयुक्त अनंत कदम, महापालिका सचिव संजय जाधव, सहा.आयुक्त स्नेहा कर्पे, माजी स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय  सरकटे, क्रिडा अधिकारी मुकणे क्रिडा पर्यवेक्षक भगत इतर मान्यवर तसेच शिक्षण विभागातील अधिकारी /कर्मचारी , शिक्षक वर्ग तसेच विदयार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या