आठवणीतील कुसूरचा शिमगोत्सव
महाशिवरात्री पार पडली आणि मार्च महिन्याची चाहुल लागली की वेध लागायचे ते होळी आणि शिमगोत्सवाचे. वाडीया जत्रौत्सवा एवढाच शिमगा हा सुद्धा प्रत्येक कुसूरवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय.
होळीच्या दिवशी दुपारी वाडीतले सर्व तरूण मंडळ एकत्र जमायचे. एकमेकांना हाक मारून सर्वांना गोळा करायचं मग खडपा डोंगर, हजाऱ्याचा माळ, टेंब, धनगरवाडा अशा डोंगरावरील जंगलात अधिच बघून ठेवलेलं एखादं शेवरीचे झाड तोडायचं, सर्वांनी त्याला वेली, बांबूंनी बांधून पकडून, नाचत धमाल करत, पूर्ण वाडीतून खालच्या वाडीत राखणी होळीच्या येथे आणून ठेवायची ही झाली "वाडीच्या राखणी होळीची " मजा.
त्यानंतर तसच पळत सारेजण, ढोलाच्या आवाजचा वेध घेत, गावची होळी जेथे तोडतात त्या ठिकाणी जायचं.. आम्ही पोहचे पर्यंत गावची होळी तोडून झालेली असायची, जवळपास सगळा गाव ही जमा झालेला असायचा. होळीला, होळीच्या मांडापर्यंत न्यायच काम सुरू व्हायचं..
होळीचा बांधा.. मुळ खोड पकडायचं काम पाटलांच - याबाबत अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी मला सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट मला आवडायची की मोठ्या मान- सन्मान, प्रतिष्ठेबरोबरचं मोठी जबाबदारी पण उचलावी लागते. पारंपारिक काळापासून कुसूरचे मुळ मानकरी पाटील असले तरी सर्व गावाला, गावांतील सर्व समाजांना सोबत घेऊन प्रत्येक वार्षिकात गावऱ्हाठी चालवणे हे पाटलांच मुख्य काम आहे हे यातूनचं अधोरेखीत होते.
मग सर्व ग्रामस्थांनी मिळून गावची होळी मांडावर आणून ठेवायची, तोपर्यंत बऱ्या पैकी अंधार झालेला असायचा... सर्व गावकरी मग आपापल्या घरी निघून जायचे.
दुसरा दिवस रंगपंचमीचा फारचं महत्वपूर्ण दिवस असायचा. सकाळी लवकर उठून अंघोळ, नास्तापाणी आवरून, नवीन कपड़े घालून वाडीच्या राखणी होळीच्या इथे हजर रहायचो. होळीचा नेम काढणे, होळीला सजवायला आंब्यांच्या फांद्या आणणे, होळीची जागा सारवायला शेण आणि पाणी आणणे अशा छोट्या मोठ्या कामात हातभार लावायचो. वाडीची होळी उभी करून, विधीयुक्त पुजा, गाऱ्हाणे करून मग सारेजण गावच्या होळीकडे हजर रहायचो. गावची होळी मोठी असल्याने ती उभी करायला थोड़ा जास्त वेळ लागायचा. मग होळीच्या मांडावर लाकडांचा आणि बांबूचा मांडव घालून, आजूबाजूचा परीसर स्वच्छ करायला मदत करायचो. मग पुढे गुरवांच काम सुरू व्हायचं. मांड परीसर शेणान सारवून घेणं, होळीच्या पाषाणाची मांडणी करणे. तोपर्यंत सुर्य डोक्यावर आलेला असायचा. मग आपला घरचा रस्ता पकडायचो. घरी आमच्या आजीने खूप सुंदर आणि चविष्ट शेवया आणि नारळाचा गोड रस बनवलेला असायचा. त्याकाळी पुरणपोळी बनवणे परवडायचे नाही. शेवयांवर मनसोक्त ताव मारून थोडीशी वामकुक्षी घेतो ना घेतो तोच ४ वाजेपर्यंत दाजी अण्णा, कमळ्या भाई, म्हाद्या दादा, शाम भाऊ, शरद पवार, बंड्या भाई, संतोष दादा असे सगळेजण जोरात हाका मारत म्हणायचे "चला रे लय लय लगोरशीला! " मग आडवणातील झाडांचा फुलोरा हातात घेऊन वरच्या वाडीतील जय श्री रामवाले यांच्या घरापासून सुरूवात करत वाडीतील सगळ्या घरांच्या खळ्यात उभ राहून मोठमोठ्याने बोलायचं.... लय लय लगोरशी, उंदिर गेला ढगाशी! उंदिराची आय कवठ खाय, आम्हाला पैका मिळतो हाय! होळ्यो! होळ्यो! अशी बोंब मारायचो.
आयना की बायना, घेतल्याशीवाय जायना! हे मुंबईकर चाकरमान्यांच्या घरासमोर ठरलेलं गाण असायचं.
मग प्रत्येक घरात मिळणारे गुळ खोबरं, दोन - पाच रुपये घेत मग आम्ही शेवटी भागोजीदाजींच्या घराच्या इथे कार्यक्रमाचा शेवट करायचो. मग होळीसमोर सारे जमा व्हायचे.. गुळ खोबऱ्याची प्रसादी बनवायची. ती सर्वांना वाटली जायची. जमा झालेल्या पैशाचा जमाखर्च केला जायचा. आणि सर्व आपापल्या घरी परतायचे.
आठ वाजता रात्री लवकर जेवण आटपून, घरातले सर्वजण नवीन कपड़े घालून होळीच्या मांडावर जायला निघायचो. वाडीतले सर्व लोक कंदिलाच्या प्रकाशात चालत निघायचो. लांबूनच लाऊडस्पीकरच्या गाण्यांचा आवाज येत असायचा. जस जसा होळीचा मांड जवळ जवळ यायचा तसा मंदिर परिसरात केलेली रोशनाई नजरेत भरायची. होळीच्या मांडाच्या बाजूलाच प्रत्येक वाडीतील लोकांना विशेषता महिलांना बसायला जागा असायची. वयाने ज्येष्ठ महिला शक्यतो सर्ववेळ तिथेच बसून असायच्या. बाकी आम्हां लहान मुलांचा उत्साह शीगेला पोहचलेला असायचा. आता मंदिर परीसराला जत्रेचे स्वरूप आलेल असायचं. चहाची, वडापाव, भजीपाव, खाजा, लाडू, लहान मुलांची खेळणी आणि विविध रंगांच्या काचेच्या बांगड्यांच्या दुकानांनी जत्रा फुलून गेलेली असायची. पहिल्यांदा एक दोन वडापाव फटाफट खाऊन घ्यायचे. त्याकाळी वर्षभरात फक्त वाडीया आणि शिमग्यालाच वडापाव खायला मिळायचा. आमची आजी, अक्काची आई आणि आईला गुपचूप एक वडापाव आणून दिला की मग मित्रांसोबत जत्रेत फिरायला मोकळे. मध्येच पावनाबाई मंदिरात एक फेरी मारून यायचो. तिथे देवांची पालखी आणि तरंग यांना जत्रेसाठी तयार करण्याचे काम सुरू असायचं. जसजशी रात्र पुढे सरकायची तसतशी माळावरची गर्दी वाढू लागायची. गावातील एकुण एक लोक, माहिरवाशीनी, मुंबईकर चाकरमानी, पै, पाहुणे, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक आवर्जून हजेरी लावायचे. सगळीकडे महिलांची खरेदीची लगबग, घोळक्या घोळक्यांनी जमलेल्या गप्पा यांनी होळीचा माळ जीवंत झालेला वाटायचा. एवढ्यात ढोल - ताशांच्या गजरात देवांची पालखी पावनाबाई मंदिरातून बाहेर पडायची. आणि सगळं वातावरण शांत होऊन जायचं. लोक पालखीच्या दिशेने धावत सुटायचे. तोपर्यंत देव आणि पालखी यांनी पारंपारिक नृत्याचा ताल धरलेला असायचा. पालखी सोबत देवांचे तरंग, निशान आणि संकासूर हे सारं मंत्रमुग्ध होऊन जायचे. ढोल, ताशे कडाडत असायचे आणि तेवढ्याच जोशात देवाची पालखी नाचवणं खूप वेळ चाललेल असायचं. पहाटे दोन तीन वाजता पालखी होळीच्या मांडात येऊन स्थानापन्न व्हायची. होळीचे आणि पालखीचे दर्शन घेऊन हळूहळू सारे आपापल्या घरी परतायचे. मोठ्या लोकांच्या तोंडी यावर्षी पालखी किती खूप वेळ नाचली याचीच चर्चा असायची. आम्ही लहान मुले मात्र त्या शिमगोत्सवाचे अनुभवलेले आठवणींचे क्षण संपूच नयेत आणि पुढच्या वर्षीचा शिमगा लवकर यावा या सुंदर, रमणीय स्वप्नांत रमून जायचो!
लेखक - श्री सुरेश भिवाजी पाटील
शिक्षक • पत्रकार • साहित्यिक •
अध्यक्ष - कुसूर विकास मंच ©️
एकच ध्यास, कुसूरचा विकास
टिप - सदर लेख हा माझा स्वत:चा वैयक्तिक अनुभव आहे. याबाबत दुमत असू शकते. कोणाला काही शंका असल्यास कृपया वैयक्तिक संपर्क करू शकता. 🙏



.jpeg)
0 टिप्पण्या