मराठी भाषा गौरव दिन हा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.

संत झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङमय मंडळाने देखील “अभिजात मराठी” या  कार्यक्रमातून मराठी भाषा गौरव दिन हा ऑनलाइन पद्धतीने  घेण्यात आला. 



 मराठी भाषा गौरव दिन’ दरवर्षी हा २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, म्हणजेच श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्यसेवा सन्मानार्थी त्यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. हा सोहळा मुंबईतील संत झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङमय मंडळाने देखील “अभिजात मराठी” या  कार्यक्रमातून साजरा केला. महामारीमुळे यावर्षी पण मराठी भाषा गौरव दिन हा ऑनलाइन पद्धतीने  घेण्यात आला. कार्यक्रमात नाट्य, नृत्य, साहित्य व संगीत यांचा सुगम संगम बघण्यास मिळाला.  निरनिराळ्या प्रकारे सजलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी देशपांडे व रुत्वि चौधरी यांनी केले. तसेच संगीत, चित्रपट, टी. वी सृष्टीतील उदात्त व्यक्तिमत्व व मराठी अभिमान गीताचे संगीतकार श्री. कौशल इनामदार यांची प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थिती लाभली होती.  सोहळ्याच्या रुपरेशे प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन  आणि कला विभागाकडून मराठमोळी रांगोळीची कलाकृती सादर करून झाली. त्यानंतर कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य व संस्कृतीला  केलेले अतुलनीय योगदान निवेदकांडून सांगण्यात आले. पुढे विद्यार्थी कलावंतांच्या विविध परफॉर्मन्सेस ने हा कार्यक्रम सुशोभित झाला होता. सुरुवातीलाच संगीत विभागाने अनेक मराठी मंजुळ गाण्यांनी वातावरण  मंत्रमुग्ध करून ठेवले. नंतर साहित्य विभागाने काव्यवाचन केलेल्या कुसुमाग्रजांची कविता 'दूर मनोर्‍यात', याने प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणले होते. 

त्यानंतर प्रमुख पाहुणे कौशल इनामदार यांनी मराठी साहित्याशी त्यांचा आलेला पहिला संबंध व त्यातली कुसुमाग्रज यांची भूमिका ही कहाणी श्रोत्यांसोबत शेअर केली. “वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!” असे इनामदार यांनी सांगितले. पुढे ढोलकीचा ताल धरत नृत्य, संगीत, नजाकतीने परिपूर्ण ठसकेबाज लावणी, नृत्य विभागाकडून सादर करण्यात आली. शेवटी नाट्य विभागाकडून मराठी भाषेला आदरांजली वाहणारा एक अनोखी ऑनलाईन नाटुकली सादर करण्यात आली. सर्व परफॉर्मन्सेस झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी, त्यांचे असलेले मराठी भाषेवरील अफाट प्रेम व अभिमान हे सुरेख शब्दांत मांडले. कार्यक्रमाची सांगता निवेदकांद्वारे  विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे, मार्गदर्शक प्राध्यापकजन, आमंत्रित प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या आभार  प्रदर्शनाने झाली व शेवटी पारंपरिकरित्या मराठी अभिमान गीत सादर केले.

उत्सवांतून "समाज प्रबोधन करणे" हा मंडळाचा नेहमीच प्रमुख उद्देश असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या