विधवा विवाह केलेल्या दाम्पत्याचा सत्कार
देवळाली प्रवरा - राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वक व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे पुतणे व दगडू त्रिंबक ढुस यांचे नातू किशोर राजेंद्र ढूस या तरुणाने नऊ महिन्याचे बाळ असलेल्या विधवा महिलेशी लग्न करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे.
त्या भगिनीनेही परंपरेला झुगारून जीवनाची नवी सुरुवात करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तेव्हा या दाम्पत्याचा 'कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या' वतीने त्यांच्या घरी जाऊन शुक्रवार दिनांक १० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते व देवळाली हेल्प टीमचे उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे.
कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती लवकरच राज्यस्तरावर विधवा विवाहाची चळवळ सुरु करते आहे. अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक अशोक कुटे यांनी यात पुढाकार घेऊन नोंदणीसाठी वेबसाइटही तयार केली आहे.
या चळवळीत होणारा हा पहिला विवाह असल्याने इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समिती या दाम्पत्याला भेट देऊन त्यांचे अभिनंदन करणार असल्याचे समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस व प्रशांत कराळे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या