डोंबिवलीत 9 दिवस 'शरद महोत्सव प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन.
डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्ह्याच्यावतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या युगाचा नवा उत्सव-शरद महोत्सव 2021 डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदान येथे शुक्रवारी १७ तारखेला आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात कला-संस्कृती, परंपरा, क्रीडा व गृहोद्योगावर भर दिला आहे. 17 ते 26 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, 142 विधानसभा महिला अध्यक्षा (कल्याण-पूर्व) मीनाक्षी आहेर व ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीने शहरात होणाऱ्या महोत्सवावर संक्रात आली होती. सांस्कृतिक डोंबिवली महोत्सवाचे आगार असूनही कोरोनामुळे सर्व थंड पडले होते. मात्र आता कोरोनचा प्रभाव कमी होऊन सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. यानंतर महोत्सवाचा पहिला बार राष्ट्रवादीच्या शरद महोत्सवाने उडणार असल्याची माहिती डोंबिवली महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड पत्रकार परिषदेत यांनी दिली.
त्या म्हणाल्या, या महोत्सवात बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ मिळणार आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले असून यामध्ये सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करण्याचे तंत्र अवगत केले जाणार आहे. या महोत्सवासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या असल्याचेही सारिका गायकवाड यांनी सांगितले. तर कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील म्हणाले, महिलांना सक्षम होण्यासाठी, तसेच बचत गटातील महिलांना या महोत्सवाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि अनुभव मिळणार आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शरद महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

0 टिप्पण्या