सातवी टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संभाव्य विजेत्यांमध्ये अग्रस्थानी असलेली टिम इंडिया आपला शेवटचा साखळी सामना खेळण्याच्या एक दिवस आधीच अधिकृतरित्या स्पर्धेतून बाद झाली आहे. तसं बघाल ७ तारखेला भारताचा सामना नव्हता. मात्र जी थोडीफार आशा होती तीही मालवल्याने टिम इंडियासह समस्त भारतीयांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला.
रविवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी इंडियाचा सदर स्पर्धेतील पहिला साखळी सामना झाला तो पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध. त्या सामन्यात टिम इंडिया हॉट फेव्हरीट होती. परंतु पाकिस्तानने मागील बारा विश्वचषक स्पर्धेतील पराभवांचा बदला घेताना भारताला खेळाच्या सर्वच क्षेत्रात निष्प्रभ ठरवत त्या सामन्यातूनच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेतूनच बाद केले. अशा रितीने स्पर्धेचा पहिला रविवार इंडिया साठी ब्लॅक संडे ठरला !
पाकिस्तानविरूध्दच्या पराभवाचा टिम इंडियावर असा काही मानसिक पराभव झाला की, आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर टिम इंडिया स्पर्धेतील आपला दुसरा सामना न्यूझिलंडविरूद्ध खेळली. पराभूत मानसिकतेने त्या सामन्यात उतरलेल्या संपूर्ण टिम इंडियाची देहबोलीच नकारात्मक होती. पाकने केला त्यापेक्षा दणकून मार न्यूझिलंडने दिला, आणि त्या पराभवा बरोबरच भारताच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाला झटका बसला. तो दिवस होता एकतीस ऑक्टोबर, अर्थात रविवार व तोही ठरला टिम इंडियासाठी ब्लॅक संडे !!
देशभर उसळलेला असंतोष, टिम इंडिया व खेळाडूंविषयी देशवासीयांचा झालेला भावनांचा उद्रेक संघातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचताच खेळाडू भानावर आले. बुधवारी तीन नोव्हेंबरला काहीशा कमजोर अफगाणिस्तानवर तुटून पडत उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशेला धुगधुगी देत धावगती सुधारली.
त्यानंतर शुक्रवारी पाच नोहेंबरला नवख्या स्कॉटलंडला कच्चं खाल्ल्यागत गोलंदाजी व फलंदाजीत सफसेल चिरडलं. त्यामुळे भारताची धावगती ब गटात असलेल्या इतर संघांपेक्षा सरस ठरली. दोन विजय, दोन पराजय यामुळे पुढील सामन्यात विजय या अपेक्षेने व अफगाणिस्तान न्यूझिलंडला हरविल या भाबड्या कल्पनेने टिम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न रंगवू लागली.
मात्र ७ नोव्हेंबर स्पर्धेतला तिसरा रविवार भारतासाठी ब्लॅक संडे ठरला !!! प्रत्यक्षात या दिवशी भारताचा सामना नव्हता, पण ज्या आफगाणिस्तानच्या विजयाची वाट समस्त भारतीय क्रिकेट शौकीन जनता पाहत होती तिच्या आशा अपेक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला. न्यूझिलंडने अफगाणिस्तानला अगदी एकतर्फी सामन्यात पराभूत करत त्यांच्या बरोबरच भारतालाही स्पर्धेतून हद्दपार केले. न्यूझिलंडचा हा विजय त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचं तिकीट देऊन गेला.
विश्वचषक स्पर्धेदरम्यान आलेले तीन रविवार टिम इंडियासाठी कर्दनकाळ ठरले. परंतु हा त्या रविवारचा दोष नव्हता. तर दोष होता भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेचा, संघ निवडीचा, चुकलेल्या रणनितीचा, बावरलेल्या कर्णधार कोहलीच्या सदोष नेतृत्वाचा, फलंदाजांमधील लोप पावलेल्या लढवय्या वृत्तीचा, गोलंदाजांच्या अकार्यक्षमतेचा, पैशामागे पळणाऱ्या बीसीसीआयच्या चुकीच्या धोरणांचा, आयपीएलला अवास्तव महत्व देण्याच्या प्रवृत्तीचा.
संघातील खेळाडूंमध्ये दुफळी असल्याचे माहीती असताना, कर्णधार कोहली खेळाडूंना व्यवस्थित वागणूक देत नसताना तसेच आयसीसी स्पर्धा त्याला रास येत नाही हे माहीती असूनही त्यालाच कर्णधारपदी ठेवणारी निवड समिती, या सर्व बाबी टिम इंडियाच्या पराभवाचे खरे कारण ठरल्या.
माझ्या मागील अनेक लेखात मी टिम इंडियातील अंतर्गत वादांवर प्रकाश झोत टाकला आहे. प्रत्येक सामन्यापूर्वी संघाला धोक्याचा इशारा देताना त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाय योजनाही सुचविल्या होत्या. शिवाय कोहली कर्णधारपदी असेपर्यंत टिम इंडिया कधीहीही आयसीसी स्पर्धा जिंकणार नाही असेही लिहीले होते. पंरतु मोठी अद्दल घडल्याशिवाय शिकायचंच नाही असे ठरविलेल्या बीसीसीआयला काही कळलंच नाही.
आता विश्वचषकानंतर नवीन प्रशिक्षक, नवा कर्णधार येईल. संघात नवे खेळाडू येतील. आणखीही बरेच काही बदल घडतील. पुढची टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा पुढच्याच वर्षी असल्याने टिम इंडियाला व समर्थकांना जास्त काळ विजेतेपदाची प्रतिक्षा करावी लागणार नाही. नवा कर्णधार नवी आशा घेऊन येईल व भारताला विजेतेपद नक्कीच मिळवून देईल हे मात्र शंभर टक्के खरे ठरणार !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या