ईगतपुरी तालुक्यातील साहित्यिक चळवळीचे प्रणेते- पुंजा मालुंजकर
----- विशेष लेख ---
(ईगतपुरी तालुका साहित्य मंडळ यांचेवतीने २२ वे साहित्य संमेलन शुक्रवार दि.२६ व २७ नोव्हेंबर रोजी ईगतपुरी महाविद्यालयात संपन्न होत आहे. या संमेलनाचे आयोजक पुंजा मालुंजकर यांच्या कार्याचा घेतलेला धावता आढावा.....)
ईगतपुरी तालुका हा भातशेतीचे आगर, पावसाचे माहेरघर, विविध प्रकल्प व धरणामुळे जसा महाराष्ट्र भर ओळखला जातो, तसाच तो साहित्यिक चळवळीबाबतही सुविख्यात आहे, आणि महाराष्ट्र भर या तालुक्याची साहित्यिक ओळख दिवसेंदिवस ठसठसीत होत चालली आहे. या सर्व साहित्यिक चळवळीचे प्रणेते किंवा ईगतपुरी तालुक्यातील सुपीक जमिनीत साहित्यिक चळवळीची रुजवण करण्याचे काम सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक असलेले पुंजाजी मालुंजकर यांनी केली आहे.
पुंजाजी मालुंजकर यांचे गाव ईगतपुरी तालुक्यातील वाडिवर्हे हे एक छोटेसे टिपिकल ग्रामीण खेडे. या खेडयात वास्तव्यास असताना वाचनाच्या आवडीतुन त्यांना लेखनाची आवड लागली. आणि मग ग्रामीण भागातील अस्सल वेदना ते आपल्या लेखनाद्वारे मांडु लागले.
हळुहळु नाशिक जिल्ह्यातील दिग्गज साहित्यिक मंडळीच्या सहवासात ते येताच साहित्य हीच सेवा हा संकल्प करत त्यांनी उभे आयुष्य फक्त साहित्य आणि साहित्यालाच समर्पित केले.
महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या कुसुमाग्रज यांचा सहवास त्यांना मिळाला आणि कुसुमाग्रज यांनी साहित्य गावकुसात गेलं पाहिजे, साहित्य संमेलन गावा गावात भरली पाहिजे असं स्वप्न असल्याचं एका भेटीत मालुंजकर यांना सांगितले.
मालुंजकर यांनी आपल्या गुरुची इच्छा प्रत्यक्षात उतरवली. त्यांनी सन १९९९ या मावळत्या व २००० या नव्या शतकापासून ईगतपुरी तालुक्यात साहित्य चळवळीची मुहुर्तमेढ रोवली.आणि आज पाहता पाहता या चळवळीचा वटवृक्ष झाला आहे.आज यंदाचे चक्क हे २२ वे वर्षे आहे.
ईगतपुरी तालुक्यातीलच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील ही असंख्य नवोदित लेखक व कवीनां त्यांनी व्यासपीठ दिले, आणि साहित्याची एक नवीन पिढी घडवली.
ईगतपुरी तालुक्यातील तुकाराम धांडे, नवनाथ गायकर, रुपचंद डगळे, राजु आतकरी, रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर गुळवे,कै. स्वामी गायकर, सौ.विदया पाटील यांसह कितीतरी लेखक, कवी घडवले तर नाशिक जिल्ह्यात विवेक उगलमुगले, रवींद्र मालुंजकर, राजेंद्र उगले, अलका कोठावदे, अलका कुलकर्णी, प्रभा कोठावदे, डॉ. भास्कर म्हरसाळे, विजयकुमार मिठे आदी कितीतरी कवी, लेखकानां व्यासपीठ देत प्रोत्साहन दिले.
आज या साहित्य यज्ञाला दोन दशके होत आहे. एखादे कार्य सतत दोन दशके अविरतपणे सुरु ठेवणे ही अवघड गोष्ट आहे. ही अशक्य कामगिरी त्यांनी फक्त साहित्यावरील प्रगाढ निष्ठेच्या बळावर सत्यात उतरवली आहे.
ही चळवळ राबवताना शासनाचे एक रुपयांची मदत त्यांनी घेतलेली नाही हे अत्यंत नवल आहे.
त्यांचा सहस्रबाहु हा दिवाळी अंक ही आज महाराष्ट्रातील एक दर्जेदार अंक म्हणून गणला जातो आहे.शिवाय त्यांची जामिन, कोणासाठी आदीसह विविध कांदबर्याही प्रसिद्ध आहेत.
मालुंजकर यांची प्रेरणा घेऊन त्यांच्याच तालमीत तयार झालेले नवनाथ गायकर यांनी ही अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सन २०१२ पासुन संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागात साहित्य संमेलन घेण्यास प्रारंभ केला आहे. शिवाय साहित्य परिषद नावाने ते दिवाळी अंक ही प्रसिद्ध करत आहेत.
आज गायकर यांच्या या चळवळीसही यंदाच १० वर्ष पुर्ण झाले असुन नाशिक शहरात नुकतेच त्यांचे १० वे साहित्य संमेलन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व जेष्ठ साहित्यीक देविदास खडताळे, प्रा.विठ्ठल शिंदे आदी मान्यवराचें उपस्थितीत संपन्न झाले आहे.
गायकर यांनी मालुंजकर यांना गुरुस्थानी मानले असुन त्यांच्या ४ थ्या साहित्य संमेलनाचे मालुंजकर हे संमेलनाध्यक्ष होते तर बेलगाव तर्हाळे येथे आयोजित साहित्य संमेलनाच्या वेळी मालुंजकर यांना आय.बी. एन.लोकमतचे तत्कालीन संपादक मंदार फणसे यांचे हस्ते जीवनगौरव हा पुरस्कार ही प्रदान करण्यात आला आहे.
आज ईगतपुरी तालुक्यात मालुंजकर व गायकर हे दोघेही हातात हात घालून साहित्यिक चळवळ वेगाने पुढे नेत असुन नव्या दमाचे साहित्यिक ही घडवत आहे.
वयाच्या साठीतही मालुंजकर हे तरुणांना ही लाजवेल अशा उत्साहाने साहित्य सेवा करत असुन लवकरच या साहित्य चळवळीचे द्विदशक झाले असुन भविष्यात ते दोन तपे लवकरच पुर्ण करतील या शुभेच्छा....!!!
---------------------------------
लेखन- नवनाथ अर्जुन पा.गायकर
जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा

0 टिप्पण्या