सातव्या विश्वचषक स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत. तर मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या प्रमुख संघांचे सराव सामने नुकतेच संपन्न झाले. सराव सामन्यांचा विचार केला तर मुख्य आठ संघापैकी भारतानेच आपले दोन्ही सामने जिंकले तर गतविजेता विंडीज दोन्ही सामन्यात पराभूत झाले. विजेतेपदाच्या शर्यतीत असलेला आणखी एक प्रमुख संघ न्युझिलंड देखील आपले दोन्ही सामने हरला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द.आफ्रिका, पाकिस्तान व अफगाणिस्तान यांची कामगिरी संमिश्र राहीली. या संघाना एक विजय तर एक पराजय पत्करावा लागला आहे.
सराव सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामने म्हणून मान्यता नसते. या सामन्यात प्रत्येक संघ आपल्या कमकुवत बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने मेहनत घेतात. किती व कोणत्या फलंदाजाला संधी द्यायची याचे बंधन नसते. तर संघातील सर्वच गोलंदाज आपले कौशल्ये अजमावू शकतात.
भारताने या दोन्ही सामन्यात आपल्या सर्वच फलंदाजांना अजमावून बघितले. तर गोलंदाजात ज्या हार्दिक पांङ्याच्या तंदुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आहे त्याने गोलंदाजी न केल्यामुळे भारतासाठी हा अनुत्तरीत प्रश्न कायम आहे. कारण हार्दिक संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू असून त्याने गोलंदाजी केली तर भारताच्या संघाचे संतुलन व्यवस्थित बनते व खेळपट्टीच्या स्वरूपानुसार वेगवान व फिरकी गोलंदाजांची निवड केली जाऊ शकते. हार्दिक सध्या फलंदाजीतही विशेष फॉर्मात नसल्याने त्याच्यापेक्षा सध्या सरस असलेल्या शार्दूल ठाकूरला झुकते माप मिळू शकते.
रोहीत शर्मा, सुर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रिषभ पंत यांची फलंदाजी या सराव सामन्यात चांगली झाली असली कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म अपेक्षे एवढा चांगला दिसत नाही तर हार्दिकला खेळविलेच तर तो संघासाठी 'असून अडचण, नसून खोळंबा ' ठरण्याचीच मोठी शक्यता दिसते.
गोलंदाजीत जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, व रवीचंद्रन आश्विनने आश्वासक कामगिरी केली आहे तर राहुल चहर व भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीत अजूनही सांशकता दिसते. वरूण चक्रवर्ती व रविंद्र जडेजा पाकविरूद्ध पहिल्या सामन्यात संघात राहाणार हे जवळ जवळ निश्चित आहे.
कर्णधार म्हणून कोहली व रोहीतनेही कौशल्य आजमावले आहे तर विराट कोहली या स्पर्धेत गोलंदाजी करताना दिसणार हे सुध्दा जवळपास पक्के झाले आहे.
या सराव सामन्यातील प्रमुख संघांची कामगिरी समाधानकारक झाली नसली तरी मुख्य स्पर्धेत हे संघ पूर्ण ताकद व जोमाने उतरून आपले अस्तित्व सिद्ध करणार आहेत. तेंव्हा या सराव सामन्यातील त्यांची कामगिरी फसवी असून विरोधकांना गाफिल ठेवण्याची ती त्यांची चालही असू शकते.
गतविजेत्या विंडीजने सराव सामन्यात फार गचाळ खेळ केला असला तरी मुख्य स्पर्धेत ते आपल्याला शिकारी वाघासारखे दिसू शकतात. तर आयसीसी स्पर्धा जिंकण्याची चटक लागलेला न्यूझिलंडचा संघ नव्याने झेप घेऊ शकतो.
वनडेचा विश्वविजेता व गत स्पर्धेचा उपविजेता इंग्लिश संघ प्रमुख खेळाडूंविना खेळत असला तरी पलटवार करण्याची क्षमता बाळगून आहे. आयसीसीच्या स्पर्धात नेहमी चोकर्स सिध्द झालेले दक्षिण आफ्रीकन यंदा छुपे रुस्तम ठरू शकतात. तर एकदाही टि२० चा विश्वचषक जिंकू न शकलेला कांगारूंचा संघ यंदा जोरदार घाव घालू शकतो.
अफगाणिस्ताने फलंदाजीत सुधारणा केल्यास त्यांच्यातही चमत्कार करण्याची क्षमता आहे हे विसरून चालणार नाही. मागील काही दिवसात वेगळ्याच संक्रमणातून जाणारा पाकिस्तानी संघ न्यूझिलंड व इंग्लंडने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर चांगलाच चवताळला असून यंदा त्यांना कमी लेखून चालणार नाही, कारण ते सध्या पिसाळलेल्या वाघासारखे प्रतिपक्षावर हल्ला करणार हे शंभर टक्के पक्कं आहे
या शिवाय पात्रता फेरीतून येणारे स्कॉटलंड, आयर्लंड, श्रीलंका व बांगलादेश यांनाही कमी लेखून चालणार नाही, कारण टि२० मध्ये कोण कधी बाजी मारेल हे सांगता येत नाही. त्यामुळे हि स्पर्धा नेमकं कोण जिंकेल हे सांगणे सध्या तरी अवघड असलं तरी या स्पर्धेद्वारे क्रिकेट शौकीनांना येता एक महिना भर दिवाळीत आनंदाची मिष्ठान्न मेजवानी मिळणार हे नक्की !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या