एव्हरग्रीन डॉ. विजय पोकळे (L.C.E.H.), तळेरे. DFC सिंधुदुर्गचे मायकल जॅक्सन.

 सिंधुदुर्गचे डॉक्टर- लेख क्र 17


एव्हरग्रीन डॉ. विजय पोकळे (L.C.E.H.), तळेरे.


DFC सिंधुदुर्गचे मायकल जॅक्सन.





जन्म 30 सप्टेंबर 1960. म्हणजे आता साठी पार झाली. पण बघून म्हणाल की वय जास्तीत जास्त पन्नास आहे.


वडील डॉ. महादेव रामचंद्र पोकळे. ते डॉ.अण्णा पोकळे या नावाने मोंड दशक्रोशीत प्रसिध्द होते. वडिलांचा जन्म कोळोशी, ता देवगड . एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी मॅट्रिक झाल्यावर एक वर्ष शिक्षकी पेशा केला नंतर मालवण येथे A.V.V. हा कोर्स केला. त्यानंतर मोंड इथे आपल्या बहिणीकडे राहून वैद्यकीय व्यवसाय चालू केला. त्याकाळी मोंड दशक्रोशीत डॉक्टरची वानवा होती. वाहत्या पाटाचे पाणी पिऊन गावच्या गाव डिसेंटरीने बेजार होत असे. झाडावरून पडून अनेक जखमी होत. सर्पदंशाच्या तर दिवसा दोन तीन केसेस असत. त्यात रात्रीच्या व्हीझीट, होम डिलिव्हरी असे खूप काम असे. 


डॉक्टरांचा जन्म विजयादशमी म्हणजे दसऱ्याला उगवत्या सुर्यासोबत झाला म्हणून नाव विजय. दहावी पर्यंत शिक्षण मोंडला झाले. नववी पास झाल्यानंतर आई डायबीटीसने युरेमिक शॉक कोमामध्ये गेल्या आणि बरोबर पंधराव्या दिवशी वारल्या. डॉक्टर शेंडेफळ. आई गेल्याचे दुःख सहन करण्यापलीकडे होते. ते निद्रानाशने ग्रस्त झाले आणि झोपेच्या गोळ्या घ्यायची पाळी आली. त्या दुःखी वातावरणात घरातील अडचण पाहून दोन नंबर बंधूंचे लग्न करायचे ठरले. त्यानंतर 2- 3 महिन्यात लग्न झाले.


या सर्व ओढाताणीत प्रिलीम परीक्षा होईपर्यंत अभ्यासाचा संबंधच तुटला होता. प्रिलीमला आपल्याला काहीही येत नाही याचा अंदाज घेऊन पोटमाळ्यावर सर्व पुस्तकांचा गठ्ठा समोर ठेवला आणि जिद्दीने वाचून काढला. दहावी परीक्षा केंद्र देवगड खूप कठीण होते. त्याकाळी खेड्यातील निकाल फक्त 10 टक्के असे. तरी दहावीत पाचव्या क्रमांकाने पास झाले, हा आईचा आशीर्वाद. 


त्याकाळी देवगडला आर्टस् आणि कॉमर्स कॉलेज होते. वडिलांच्या आग्रहास्तव कॉमर्सला प्रवेश घेतला. SY BCom झाल्यावर वडील बंधू डॉ. रघुनाथ यांनी lambreta स्कुटर घेतली होती, ती शिकायची हौस आली पण एके दिवशी अपघात होऊन खांद्याला ढोपराना जखमा झाल्या. त्यामुळे TY ला गॅप दयायचा विचार केला. दरम्यान त्यांचे दोन नंबर भाऊ डॉ. प्रकाश बेळगावी सासुरवाडीला गेले होते. तेथे डॉ. पाडगांवकर, प्रोफेसर A M Sheikh homeopathic medical college यांच्याशी खूप गप्पा झाल्या. त्यात डॉक्टरांविषयीही बोलणे झाले. बेळगाव वरून परत आल्यावर वडिलांशी विचारविनिमय करून, यांचा कल पाहून A M Sheikh homeopathic medical college ला प्रवेश घेतला. 


यानंतर तेथील शिक्षण पूर्ण करून मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करत असताना वडील गेले. त्यानंतर एप्रिल 1987 पासून तळेरे इथे विनोद हॉटेल शेजारी पाच वर्षे प्रॅक्टीस केली. ह्या पाच वर्षात तरेळे ST स्टँडच्या मागे जमीन घेऊन बांधकाम चालू केले. 


मार्च 1989 ला सौ. सीमा यांच्याशी विवाह झाला. त्यांचे माहेर आचरा. त्या ग्रामीण बँकेत नोकरीत होत्या पण रत्नागिरीला बदली झाल्यामुळे राजीनामा देऊन क्लिनिक शेजारी मेडिकल स्टोअर चालू केले. त्यासाठी BCom असताना बारावी सायन्सची परीक्षा देऊन DPharm करावे लागले. 


डॉक्टरांनी छान सेवा दिली आहे. अनेक कठीण केसेस हाताळल्या. एक कठीण प्रसूतीची केस होती. नातेवाईकांनी आशा सोडली होती. शेवटी डॉक्टरांकडे आणले आणि हात जोडून विनंति केली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून प्रसूती केली. पण बाळ मरणासन्न होते. नातेवाईक त्याला मृत समजून घेऊन निघाले होते. परत डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि काय आश्चर्य ते बाळ सुद्धा चांगल्या अवस्थेत आले. 


**

सद्गुरू वामनराव पै यांच्या आठवणी ते सांगतात. साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा.


सद्गुरू पै यांचा एक कार्यक्रम वैभववाडी येथे ठरला होता. त्यावेळी त्यांचे वास्तव्य डॉ. पोकळे यांच्याकडे तळेरे येथे करायचे ठरले पण अचानक पै माऊली याना कल्पना न देता त्यांचे वास्तव्य वैभववाडीतील एका घरात करायचे ठरवले. 


सद्गुरुंच्या आगमनानंतर गर्दी चालू झाली. त्यात ते असा विचार होते की डॉ. पोकळे मला अजूनपर्यंत का भेटले नाहीत. रात्री हा प्रश्न त्यांनी व्यवस्थापकांना विचारला तर ते म्हणाले की आपण दुसऱ्या ठिकाणी राहायला आलो आहोत. ते ऐकताच पै माऊली बेचैन झाले आणि त्यांनी डॉ. पोकळे यांच्याकडे जायची इच्छा व्यक्त केली. पहाटे चार वाजता चार पाच गाड्या घेऊन पै माऊली आणि कार्यकर्ते डॉक्टरांकडे आले त्यावेळेस त्यांना समाधान वाटले. त्यांनी येथे चार दिवस निवास केला. 


याच काळात त्यांना घशाचा त्रास झाल्याने त्यांनी डॉक्टर याना औषध द्या अशी सूचना केली. डॉक्टर द्विधा मनस्थितीत गेले कारण त्रास बरा झाला नाही तर काय? पै माऊली यांनी ते ओळखून त्यांना सांगितले तुम्ही औषध द्या. माझा त्रास नक्की बरा होणार. त्याप्रमाणे औषध दिले, घसा बरा झाला , छान प्रवचन झाले आणि माऊली म्हणाले की डॉक्टर, माझ्या मुखातून जणू तुम्हीच बोलता आहात. 


यापुढेही अजून एका दौऱ्यात पै माऊली सोबत जवळचे संबंध आले. 


**

डॉक्टरांना नृत्यकला अवगत असून त्याचा आविष्कार जल्लोष या (DFC) सिंधुदुर्ग डॉक्टर लोकांच्या संमेलनात झाला. त्याला कारणीभूत त्यांचे पुतणे डॉ. प्रशांत पोकळे आणि डॉ. रामदास बोरकर. कोलावरी आणि अप्सरा आली यावर उस्फुर्त असे हे सादरीकरण प्रेक्षकांना खूप आवडले. त्यानंतर या वयातही नृत्याच्या वाटचालीस  बंधू रामदास पोकळे उभयता व बहीण  स्वाती यांचे प्रोत्साहन लाभले.


** 

ते कवी सुद्धा आहेत. सिंधुदुर्ग डॉक्टर संघाची त्यांना साथ असते. बाप या विषयावर एक हृदयस्पर्शी मालवणी कविता त्यांनी केली आहे.


मुलगा संकेत MD मेडिसिन करत आहे. मुलगी स्मिता MDS हा दातांच्या डॉक्टरीतील कोर्स करून लेक्चरर झाली आहे.


**

मी 2011 साली माझे सेन्टर ओपन करताना डॉक्टरना भेटलो. हसतमुख, उमदे आणि मदतीला तत्पर असे व्यक्तिमत्त्व आहे.


2015 साली माझे CT स्कॅन माझ्याच नातेवाईकांनी बुडवले. तेव्हा अनेक मशिनरी पडून राहिली , कवडीमोलाने विकायची वेळ आली. त्यातील एक डिजिटल एक्स रे मी कासार्डे इथे चालू केला. तो चालला नाही तरीही डॉ. पोकळे सरांनी त्यावेळी खूप सहकार्य केले.


असे हे आमचे एव्हरग्रीन डॉक्टर असेच सदाहरित राहोत.



डॉ. सतीश सदाशिव पवार

कणकवली

30 sep 2021.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या