केडीएमसीचा 'ब्रेक द चेन' च्या लेव्हल-३ मध्ये समावेश, बघा नियमावली..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत नव्याने ५ स्तरीय नियमावली लागू केली असून कल्याण डोंबिवली महापालिकेचा ३ ऱ्या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानूसार इतर दुकाने आणि आस्थापना सुरू करण्यास मुभा देण्यात आली असली तरी शनिवार आणि रविवार मात्र अत्यावश्यक वगळता इतर सर्व गोष्टी बंदच राहणार आहेत.
कोवीड पॉझिटिव्हीटी रेट आणि आयसीयू बेडची उपलब्धता या निकषांवर आधारित राज्य शासनाने उद्यापासून अनलॉकचे नविन नियम लागू केले आहेत. त्यामध्ये राज्यातील जिल्ह्यांचा आणि त्यातील महापालिकांची या निकषांनुसार १ ते ५ स्तरीय विभागणी केली आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचा ३ ऱ्या स्तरात (लेव्हल ३) समावेश करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आत असला तरी आयसीयू बेडची उपलब्धता मात्र शासकीय निकषांपेक्षा कमी आहे. परिणामी केडीएमसीचा ३ ऱ्या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
लेव्हल ३ नूसार कल्याण डोंबिवलीत इतर सर्व दुकाने, कार्यालये, हॉटेल, मंगल कार्यालये, खासगी कार्यालये (प्रायव्हेट ऑफिसेस), लग्न समारंभ, अंत्यविधी, बांधकामे, ई-कॉमर्स, जिम, सलून, ब्युटी पार्लर, माल वाहतुक सेवा, उत्पादन, खेळ, शूटिंग आदींबाबत नव्याने नियम लागू करण्यात आले आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मॉल्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह यांना आताही परवानगी देण्यात आलेली नाहीये. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने, खासगी कार्यालये बंदच राहणार असल्याचे केडीएमसीने जाहीर केलेल्या नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
लेव्हल ३ नूसार असे आहेत नवीन नियम…
दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार.
मॉल्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन, नाट्यगृह बंदच राहणार
हॉटेल-रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. दुपारी ४ नंतर फक्त पार्सल, टेक-अवे आणि होम डिलिव्हरीला परवानगी.
लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी.
सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंगसाठी दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार.
फक्त मैदानी खेळांना सकाळी ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत परवानगी असणार.
सामाजिक/ राजकीय/ मनोरंजन समारंभांना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे.
लग्न समारंभ ५० व्यक्तींना परवानगी
अंत्यविधी २० व्यक्तींना परवानगी
राजकीय मेळावे, निवडणूक, सर्वसाधारण सभाना ५० टक्के क्षमतेने उपस्थितीला परवानगी.
जिम,सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटरना एसी न चालवण्याच्या अटीवर (अपॉइंटमेंट घेतलेल्या व्यक्तीच )५० टक्के क्षमतेने परवानगी.
सार्वजनिक बस वाहतुकीला १०० टक्के क्षमतेसह परवानगी देण्यात आली असून उभ्याने मात्र प्रवास करता येणार नाही.
जमावबंदी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लागू असून त्यानंतर संचारबंदी (कर्फ्यु) सुरू असणार.
0 टिप्पण्या