१०३ मॉडीफाईड सायलेन्सर निष्काशनाची संयुक्त रित्या कारवाई..

 शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली व कोळसेवाडी

कडून १०३ मॉडीफाईड सायलेन्सर निष्काशनाची

संयुक्त रित्या कारवाई.. 





प्रतिनिधी: अवधुत सावंत


  डोंबिवली शहरातील काही दुचाकी स्वार आपल्या दुचाकीस कंपनीकडून लावण्यात आलेल्या सायलेन्सर मध्ये  Modification (बदल) करून कर्ण कर्कश्श आवाज काढत शहरामध्ये फिरत असतात. त्यांच्या अश्या वर्तनामुळे ध्वनिप्रदूषण होत असून, त्या आवाजामुळे सामान्य जनता विशेष करून वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत होता.


  नमूद कसुरदार वाहनचालक यांच्यावर कारवाई करणे कामी मा. श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे, यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वेळोवेळी सहा. पोलीस आयुक्त, श्री.उमेश माने पाटील, वाहतूक विभाग कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते, सहा.पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ चव्हाण, वाहतूक पोलीस अंमलदार यांनी डोंबिवली शहरात विशेष मोहीम राबवून एकूण ८३ मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेऊन नमूद कसुरदार वाहन चालकांच्या विरोधात ई-चलन मशिनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


तसेच कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुरेंद्र शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ चौधरी व वाहतूक पोलीस अंमलदार कोळसेवाडी यांनी कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या हद्दी मध्ये वरील प्रमाणे विशेष मोहीम राबवून एकूण २० मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेऊन नमूद कसुरदार वाहन चालकांच्या विरोधात ई-चलन मशिनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


सदर वरील विशेष कारवाई करून  ताब्यात घेतलेले एकूण १०३ सायलेन्सर मॉडीफाईड असल्याबाबत  कल्याण आर.टी. ओ यांच्याकडून खात्री केली असून सदरचे मॉडीफाईड सायलेन्सर हे बेकायदेशीर असल्याने त्याचा परत कोणाकडून गैरवापर होऊ नये याकरिता ते १०३ मॉडीफाईड सायलेन्सर आज रोजी म्हसोबा चौक, ९० फुटी रोड, डोंबिवली पूर्व या रस्त्यावर मांडून त्यावर रोडरोलर फिरवण्यात आला आहे.


यापुढेही वाहतूक उपशाखा डोंबिवली व कोळसेवाडी यांच्या संयुक्त वतीने Modification (बदल) सायलेन्सर करून वाहन चालवणाऱ्यांचे तसेच वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे असे श्री बाळासाहेब पाटील, पोलीस उपयुक्त वाहतूक विभाग ठाणे, यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.


डोंबिवली शहरातील जनतेस याद्वारे आवाहन करण्यात येते की, कोणीही दुचाकीस्वार आपल्या दुचाकीस कंपनीकडून लावण्यात आलेल्या सायलेन्सर मध्ये Modification (बदल) करणार नाही. Modification (बदल) केला असल्यास ते पूर्ववत कंपनी फिटेड सायलेन्सर लावतील. यापुढे जो कोणी वाहन चालक आपल्या दुचाकीस कंपनीकडून लावण्यात आलेल्या सायलेन्सर मध्ये Modification (बदल) करून सार्वजनिक रस्त्यावर कर्ण कर्कश्श आवाज काढत शहरामध्ये फिरत असताना मिळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच त्याचा वाहन परवाना रद्दबातल करण्याची कारवाई करण्यात येईल.


त्यामुळे नागरिकांनी आपल्या दुचाकीस कंपनी फिटेड ओरिजिनल सायलेन्सरच लावावेत असे आवाहन शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली व कोळसेवाडी शाखेकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या