मोठी बातमी! राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे 'अनलॉक', सर्व निर्बंध मागे; जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी..

 मोठी बातमी! राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे 'अनलॉक', सर्व निर्बंध मागे; जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी..



प्रतिनिधी: अवधुत सावंत


      राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे 'अनलॉक', व सर्व निर्बंध मागे घेतले गेले आहेत. जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी केली गेली आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.


     राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्यासोबतच राज्यात आता एकूण पाच स्तरांवर अनलॉक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


     राज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची ठिकाणं सुरू ठेवता येणार आहेत. या पहिल्या स्तरामध्ये एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे. 


अनलॉकचे एकूण पाच स्तर नेमके कोणते ?


पहिला स्तर- पूर्णपणे अनलॉक:

पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.


दुसरा स्तर- मर्यादित स्वरुपात अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.


तिसरा स्तर- निर्बंधासह अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील.


चौथा स्तर- निर्बंध कायम: पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील.

 

पाचव्या स्तर- रेड झोन, पूर्णपणे लॉकडाऊन: पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.


मुंबई लोकलचं काय ?


  मुंबईचा दुसऱ्या स्तरामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी लोकल सेवा सुरू होणार नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. पण येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली तर लोकल संदर्भातही निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या स्तरामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे.


पहिल्या स्तरात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के असलेल्या १८ जिल्ह्यात या गोष्टी सुरु..


  रेस्टॉरंट, मॉल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील.


  खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील. चित्रपट शुटींगला परवानगीमुळे थिएटर सुरू होतील.


  सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सुट दिली गेली आहे.


 ई-कॉमर्स सुरू राहिल

जिम, सलून सुरू राहणार

पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.

 बस १०० टक्के क्षमतेने

आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल

इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील
असे विजय वडेट्टीवार  प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या