मुंबई - कुर्ला-अंधेरी रोड म्हणजे वाहतूक कोंडीचा प्रवास, मात्र आता ह्या मार्गावर वाहतूक सुरळीत व आरामदायक प्रवास होण्याच्या दृष्टीने शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कार्य सुरू केले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अतिशय महत्त्वाच्या कुर्ला अंधेरी रोड रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मंगळवारपासून सुरुवात करण्यात आले आहे.
आमदार दिलीप लांडे यांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणात येणारी दुकाने, घरे पालिकेने निष्कासित करण्यास सुरुवात केली असून या तिसऱ्या टप्प्यात सफेद पूल ते साकीनाका विभागातील बांधकामे पाडण्यात येत आहेत. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या पाठपुराव्याने अखेर आता या रस्त्याच्या रुंदीकरणाने वेग घेतला आहे. कुर्ला-अंधेरी रोड हा रस्ता हा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून कुर्ला, विद्याविहार, अंधेरी, पवई, साकिनाका, घाटकोपर आदी विभागाकडे जाणारा एकमेव वाहतुकीचा रस्ता आहे.मात्र गेले २५ वर्षे या रस्त्याचे रुंदीकरण खोळंबल्याने या मार्गावर तासनतास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे या मार्गावरून ये जा करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.मात्र आता हे रुंदीकरण सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या वर्षात हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे रुंद आणि वाहतुक कोंडी मुक्त होईल अशी आशा आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी आमदार दिलीप लांडे यांच्यासह शाखाप्रमुख शैलेश निंबाळकर, नितीन गोखले, शाखा संघटिका पार्वती शिंदे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या