ऐका हो ऐका! सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर झपाट्याने उतरला!!!




पुन्हा एकदा "करून दाखवलं"! सिंधुदुर्गातल्या कोरोनाला प्रशासनाने "कागदोपत्री " हरवलं!!


काल सिंधुदुर्गातला कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट राज्यात सर्वोच्च  आणि मृत्युदर भयावह असल्याचा लेख सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अक्षरशः शेकडो फोन आले. अनेक अभ्यासू प्रतिक्रिया आल्या. समाजातील डॉक्टर, वकील आदी बुद्धिजीवी नागरिकांनीही वस्तुस्थिती सत्य असल्याचे सांगत परखड लेखाबद्दल कौतुकच केले. उत्स्फूर्त आणि मनमोकळ्या शब्दात प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी सर्वांचाच आभारी आहे. अनेक अभ्यासू प्रतिक्रियांबद्दलची चर्चा मी या दुसऱ्या लेखात लिहिणार होतो. पण......


हा "पण" कोरोनाच्या व्हायरसपेक्षाही भयंकर अशा प्रशासकीय वैचारिक व्हायरस बद्दलचा आहे, ज्याने पुन्हा एकदा लिखाणाची दिशा बदलायला लावली. केवळ जेमतेम दोन दिवसातच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली. यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कागदोपत्री  कोरोना पॉझिटिव्हीटी दर अचानक प्रचंड वेगाने गडगडला आहे. अवघ्या दोन दिवसात आकडेवारी बदलून ती १९ वरून चक्क १२.७० पर्यंत खाली आली आहे. कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा यांना पाठी टाकत सिंधुदुर्गातल्या कोरोनाला कागदोपत्री हरवून टाकण्याचं काम प्रशासकीय यंत्रणेने झटक्यात करून दाखवलं आहे. मात्र  या "करून दाखवलं" च्या नादात दररोज सरासरी पाचशेभोवती फिरणारा कोरोनाबधितांचा आकडा स्वतःच  संभ्रमित झाला आहे. या सावळ्या गोंधळात नऊ व्यक्तींना त्यांचे कुटुंबीय मात्र कायमचे गमावून बसले आहेत. 


सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर होता. याच्या कारणांची चर्चा मी यापूर्वीच्या लेखात सविस्तर केली आहे. एकूण तपासल्या गेलेल्या नमुन्यांपैकी सुमारे २२ टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्हिटी येत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून अचानकपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा कमी होऊ लागला आहे. 


खरंतर ही एक सकारात्मक व आनंदाची बातमी म्हणायला हवी.  सर्वच जनतेने याचे जोरदार स्वागत आणि अभिनंदन करायलाच हवे होते. पण... 

पण या सर्व गोष्टीचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की घसरणारा पॉझिटिव्हिटी दर हा वास्तव नसून एक आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कोरोना बाधित व्यक्ती जशा स्वतःला लपवत घरातल्या घरात उपचार करून घेत होत्या आणि सगळ्या कुटुंबाला तापदायक ठरत होत्या, प्रशासन आता स्वतःही त्याच मार्गावर जाऊ लागले आहे.


या अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट व आर.टी.पी.सी.आर टेस्ट ह्या आवश्यकतेनुसारच केल्या जात असत. म्हणजे एका कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे नमुने तपासण्यात येत होते. यालाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हटले जाते. याशिवाय कोणाही एका व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला, श्वास लागणे किंवा कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्यास त्याचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. याबरोबरच जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये अन्य आजारांसाठी ऍडमिट होणाऱ्या रुग्णांची देखील नमुने तपासण्यात येतात. अशाप्रकारे विविध कारणांसाठी कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्यांचे नमुने घेऊन ते तपासण्यात येतात व एकूण तपासलेल्या नमुन्यांपैकी किती लोकांचे व्यक्तींचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले त्यावरून पॉझिटिव्हिटी रेट ठरवला जातो. मात्र गेल्या आठवड्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना टेस्टच्या आकड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. म्हणजेच जिथे दिवसाला २-३ हजार नमुने घेतले जायचे तिथे अचानक ५ हजारच्या पुढे नमुने घेतले जात आहेत. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना तर स्पष्ट तोंडी आदेश देण्यात आलेले आहेत की प्रत्येक ठिकाणी किमान १०० नमुने घेण्यात यावेत. अनेक ठिकाणी पोलिसांमार्फत किंवा स्थानिक प्रशासनामार्फत नाकाबंदी केली जात आहे व फिरणाऱ्या व्यक्तींचे नमुने घेतले जात आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये ओपीडी करिता आलेल्या किंवा लसीकरणाकरता आलेल्या व्यक्तींचे देखील नमुने घेतले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाकरता आलेल्या व कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे नसलेल्या सुमारे ५० व्यक्तींचे नमुने तपासणी करता घेण्यात आले. धक्कादायक गोष्ट म्हणजे नमुने घेतल्यानंतर त्यांचे रिझल्ट यायच्या आतच त्यांचे लसीकरण देखील करण्यात आले. म्हणजेच घेण्यात येणारे नमूने हे कोरोना रुग्ण शोधण्याकरता नव्हे तर तपासण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या वाढवण्याकरता घेण्यात येत आहेत. म्हणजेच जिथे दर दिवशी १०० नमुने तपासण्यात येत होते तिथे अचानक पणे २०० नमुने तपासण्यात येत आहेत आणि त्यामुळेच जिथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० रुग्ण प्रति १०० नमुने म्हणजेच २० टक्के होती तिथे आता २० रुग्ण प्रति २०० नमुने म्हणजेच १० टक्क्यावर आली.


खुद्द जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत यांनीही अशा प्रकाराची गंभीर दखल घेत पॉझिटिव्हीटी कमी करण्याच्या नादात स्थानिक नागरिकांना वेठीस धरू नका, असा इशारा दिला आहे. त्यांनी अशा एका तक्रारीची दखल घेत कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत तेथील डॉक्टर मनिषा चुबे यांच्याकडून माहिती घेतली, तेव्हा उघड झाले की कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात जास्तीच जास्त नागरिकांची स्वॅब टेस्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आधी स्वॅब टेस्टिंग अन लगेचच लसीकरण असा नागरिकांना संभ्रमित करणारा प्रयोग कुडाळ तालुक्यात उघडकीला आला. जिल्ह्यात इतरत्र जवळपास अशीच स्थिती आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही "विनाकारण" गटात टाकून त्यांची रॅपिड टेस्ट चालवली जात आहे. हा तपासणी दर अर्थातच कमी असणार आहे हे कोणीही ऐरागैरा सांगू शकतो. गावागावात तपासणी करून ज्यांच्यात काही कोरोनासदृश्य लक्षणे आहेत, त्यांचीच प्राधान्याने तपासणी करण्याची गरज आहे, पण त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचे आता सर्वांच्याच लक्षात येऊ लागले आहे.


गांभीर्यपूर्वक विचार केला तर हा सर्व आकड्यांचा खेळ खेळला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये जाणे हे जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. ते लपवण्याकरता व सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड झोन मधून बाहेर ग्रीन झोन मध्ये ढकलण्याकरता अशा प्रकारची आकड्यांची जुळवाजुळव करून व चुकीच्या पद्धतीने नमुने तपासून एक आभासी चित्र निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात पाहता आज प्रतिदिनी सुमारे ५०० ते ६०० एवढे रुग्ण सापडत आहेत व यामध्ये कोणतीही कमी होत नाहीय. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील दरदिवशी १० च्या आसपास आहे. त्यामुळे केवळ आकड्यांचा खेळ करून जनतेची व सरकारची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न जिल्हा प्रशासन व सत्ताधार्‍यांकडून सुरू आहे. त्यामुळे भले राज्य सरकारच्या यादी मधून सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मधून बाहेर पडेल, परंतु दर दिवशी मृत्यू पावणारे व दर दिवशी कोरोना पॉझिटिव होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होणार नाही हे देखील जिल्हा प्रशासनाने वेळीच जाणून घ्यावे.


जिल्हा रेड झोन मधून ग्रीन होणे कोणाला नकोस? किंबहुना झोनमध्येच नको तर तो पूर्ण कोरोनामुक्त व्हावा हीच सर्वांची अपेक्षा आहे. कारण कोरोनामुक्तीनंतर जिल्ह्याला पुढे कितीतरी आव्हानांना तोंड द्यायचे आहे. लॉकडाऊन होण्याच्या आधीच अतिवृष्टी, वादळे यातून इथल्या इथली अर्थव्यवस्था कोलमडलेली होती. लॉकडाऊन हा आधीच दुष्काळानंतर आलेला तेरावा महिना आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुक्तीनंतरची आव्हाने फार मोठी आहेत. परंतु आजच्या धोकादायक परिस्थितीतच जर जिल्हा ग्रीन झोनमध्ये नेण्याचा प्रयत्न चालवला, तर भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था जिल्ह्याची होऊन बसेल. "करून दाखवलं" च्या नादात न भूतो न भविष्यती अशी हानी होईल. त्यामुळे आज कागदी घोडे नाचवत कागदावर विजयी होण्यापेक्षा प्रामाणिकपणे कठोर उपाययोजना करून जिल्हा खरोखरच कोरोनामुक्त करण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. लोकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. अजूनही स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत ठीकठिकाणी "गाव बंद" मोहिमा चालत आहेत. त्यांच्या प्रामाणिक धडपडीची चेष्टा प्रशासनाने चालवू नये. आजही मिळणाऱ्या अशा लोकसहभागाची प्रशासनाला किंमत नसेल, तर या दुर्दैवाची किंमत पुढे संपूर्ण राज्याला भोगावी लागणार आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा ही पर्यटनाची राजधानी होती, आहे आणि राहणार आहे. कोरोनाचा व्हायरस  इथून स्वतःची "टुरिस्ट एजन्सी" चालवू शकतो, हे विसरून कसे चालेल?


---अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग

                       9422957575

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या