मानखुर्द , शिवाजीनगर घाटकोपरमध्ये नालेसफाई झालेलीच नाही - भाई जगताप





मुंबई - साधारणतः पावसाळ्यापूर्वी ३१ मे पर्यंत मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण व्हावीत असे आपल्याला अभिप्रेत असते. त्यासाठी आज मी स्वतः मध्य मुंबईतील धारावी, मानखुर्द-शिवाजीनगर, घाटकोपर विभागातील नाल्यांची पाहणी केली असताना असे आढळून आले की, मुंबईत नालेसफाई झालेलीच नाही. मुंबईमध्ये १००% नालेसफाई झाली असा दावा जो मुंबई महानगरपालिका करत आहे तो संपूर्णपणे खोटा आहे, हेच या पाहणीतून दिसून येत असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. 


भाई जगताप पुढे म्हणाले की,दरवर्षी महापालिकेकडून १०० कोटी रुपयांचे टेंडर मुंबई महापालिकेकडून काढले जाते. नाले साफ करून नाल्यांमधील गाळ काढून, त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी हे पैसे दिले जातात. पण आज केलेल्या पाहणी दरम्यान असे आढळून आले की, नाल्यामधील गाळ काढून त्याचे ढीग नाल्याच्या बाजूला रचून ठेवले जात आहेत. त्यामुळे या परिसरात कमालीची दुर्गंधी तर पसरतेच, पण जोराचा पाऊस पडल्यावर तो सर्व काढलेला गाळ पुन्हा  नाल्यामध्ये जातो. मग या नालेसफाईचा काय उपयोग? आपल्याला माहित आहे की, सायन, धारावी सारख्या सखल विभागात पावसामध्ये खूप पाणी तुंबते. जर नालेसफाई झाली नाही. या साचलेल्या पाण्याचा निचरा कुठे होणार? मुंबई महानगरपालिकेने याचे उत्तर द्यावे.  या सर्व प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, असा माझा आरोप आहे. या प्रकरणाची संपूर्णतः सखोल चौकशी करून जे कोणी या परिस्थितीला जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे,   भाई जगताप हे मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेत भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सहखजिनदार अतुल बर्वे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या