अजब दावा - सिगारेट ,बीडीतील घटक कोरोना रोखतो

 सिगारेट ,बीडीतील घटक कोरोना रोखतो मुंबईतील व्यापारी संघटनांचा अजब दावा


मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल




मुंबई - देशभरात कोरोना होऊ नये म्हणून लसीकरण सुरू असताना मुंबईतील बीडी तंबाखु व्यापारी असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशनने चक्क मुंबई उच्च न्यायालयात एक अजब दावा केला आहे. सिगारेट, बिडी ओढणाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गाचा अधिक धोका नाही. उलट त्यातील निकोटिन हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे,' असे या संघटनानी म्हटले आहे.


वास्तविक याआधी काही  जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी धूम्रपानाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.कोरोना विषाणूचा हल्ला हा प्रामुख्याने फुफ्फुसांवर होतो आणि धूम्रपान करणाऱ्यांची फुफ्फुसे कमकुवत होतात, असे  वैद्यकीय अभ्यासांमध्ये म्हटले जाते . मग धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग अधिक आहे, असे काही आहे का? याविषयी काही अभ्यास अहवाल आहे का? अशी विचारणा करत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने त्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्या अनुषंगाने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी टाटा स्मारक केंद्राच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल सादर केला. धूम्रपानामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.'टाटा'च्या या अहवालावर तंबाखू व बिडी विक्रेत्यांच्या दोन संघटनांनी मंगळवारी हस्तक्षेप अर्ज दाखल करत आमचेही म्हणणे ऐकावे, अशी विनंती केली. खंडपीठाने  दोन्ही संघटनांना हस्तक्षेप करण्याची अनुमती दिली. त्यावेळी एका अहवालाच्या आधारे संघटनांनी हा दावा केला. खंडपीठाने यावर आश्चर्य व्यक्त केले  'सिगारेट, बिडी विक्रेत्यांच्या संघटनांचा हा दावा स्वीकारायचा झाला तर केंद्र सरकारने अशा उत्पादनांवर जो वैधानिक इशारा छापण्याचे बंधनकारक केले आहे तो इशाराचा काढून टाकण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलायला हवे , असे  उपहासात्मक निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. यावर पुढील तारखेला तपशीलवार सुनावणी घेऊ, असे  न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या