१ जूनपासून मासेमारी बंद, प्रशानाकडे मच्छीमारांकडून मुदतवाढीची मागणी..

 १ जूनपासून मासेमारी बंद, प्रशानाकडे मच्छीमारांकडून मुदतवाढीची मागणी..





प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

  महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ नुसार १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने गेल्याच आठवडय़ात दिले आहेत.

परंतु यंदा माशांचा अभाव आणि तौक्ते चक्रीवादळाचा फटका यामुळे मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून १ जून ऐवजी १५ जूनपासून मासेमारी बंदी लागू करावी, 

अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

 

  जून-जुलै महिन्यात येणारे वादळी वारे, सोसाटय़ाचा पाऊस यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दोन महिने मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश दरवर्षी सरकारकडून दिले जातात.

शिवाय हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारी करणे योग्य नसल्याचे मच्छीमार सांगतात. 

परंतु कोरोनामुळे कठीण काळ आल्याने नियमापेक्षा अधिक दिवस मासेमारी करण्यास परवानगी द्यावी, असे मत मच्छीमारांकडून व्यक्त होऊ लागले आहे.

 

  ‘मासेच उपलब्ध नसल्याने वर्षभर मच्छीमारांनी तोटा सहन केला. शिवाय वादळापूर्वी आणि वादळानंतर काही दिवस मासेमारी बंदच होती. यात जवळपास दहा दिवस गेले. आताही मासेमारी करताना पुरेसे मासे हाताला लागत नाहीत. 

त्यामुळे किमान १५ जूनपर्यंत मासेमारी करता आली तर आम्हाला दिलासा मिळेल,’ असे मढ येथील मच्छीमार संतोष कोळी यांनी सांगितले. त्या संदर्भात सरकारला निवेदनही देण्यात आले आहे.

 

  मच्छीमार कृती समितीने मात्र या मागणीला विरोध केला आहे. 

आधीच तौक्ते चक्रीवादळात मच्छीमारांना नुकसान झाले आहे.

त्यात जूनमध्ये मासेमारी सुरू ठेवली आणि त्यावेळी नैसर्गिक आपत्ती ओढवली तर मच्छीमारांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शिवाय तसे झाल्यास जबाबदारी कुणाची असाही प्रश्न येतो. त्यामुळे मच्छीमारांनी पुढचा विचार करून या मागणीचा पुनर्विचार करावा,

अशी विनंती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या