कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीचा तुटवडा..

कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीचा तुटवडा..



कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे.

प्रतिनिधी: अवधूत सावंत (डोंबिवली)


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात महाभयंकर कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून आज एकाच दिवशी तब्बल ३९२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. असे असताना दुसरीकडे मात्र कोरोना लसीचा तुडवडा असल्याची बाब समोर आली आहे. 


लसीचा स्टॉक संपल्याने नागरिकांची निराशा..

 

सद्या कोविड लसीकरण मोहिम शहरात राबवली जात आहे. त्यामध्ये जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात लस टोचून घेत आहेत. त्यातच सरकारी रुग्णालयात ही लस निःशुल्क मिळत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर काही खाजगी हॉस्पिटलमध्ये 250 रुपये शुल्क घेऊन ही लस दिली जात आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीतील मिलापनगरमधील एम्स या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या 6 मार्चपासून नागरिकांना लस देणे चालू केले होते. दररोज मोठ्या प्रमाणात सकाळी लवकर येऊन नागरिक त्यासाठी रांगा लावत आहेत. त्यामुळे एम्स हॉस्पिटलच्या वतीने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी दररोज दोनशेच्या आसपास नागरिकांना लस दिली जात होती. मात्र मंगळवार 9 मार्च रोजी सकाळपासून लसीकरणासाठी आलेले दोनशे पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांना दुपारी बारा वाजल्यानंतर लसीचा स्टॉक संपला आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना निराश होऊन घरी परतावे लागले.


लस पुरवठा खाजगी रुग्णालयात उपलब्ध करून द्यावा... 

नागरिकांच्या मते, एम्स हॉस्पिटलचा दोष नाही. मात्र जर पुरेसा स्टॉक नव्हता तर तशी कल्पना दिली असती तर आम्ही एवढा वेळ थांबलो नसतो, अशा प्रतिक्रिया काही जेष्ठ नागरिकांनी दिल्या आहेत. लसीचा स्टॉक अजून तीन ते चार दिवसांनी येण्याची शक्यता आहे, असे एम्स हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे लस पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. ही बाब समोर आली आहे. केडीएमसी व शासनाने खासगी हॉस्पिटलना लस उपलब्ध वेळीच करून दिली पाहिजे. त्यामुळे सरकारी रुग्णालयावर पडणारा ताण कमी होईल, असे डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे. 


रुग्ण संख्या पोहोचली ६५ हजार ४३३च्या घरात..

 

कल्याण डोंबिवली आजच्या नव्या ३९२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ४३३ इतकी झाली आहे. यामध्ये २ हजार ३६० रुग्ण उपचार घेत असून ६१ हजार ८९६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १ हजार १७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३९२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-६७, कल्याण प– १२८, डोंबिवली पूर्व –१२९, डोंबिवली प – ५२, मांडा टिटवाळा – १२, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या